Video – धक्कादायक! काचेच्या दरवाज्यावर धडकल्याने महिलेचा मृत्यू

बँकेमध्ये आलेल्या एका महिला ग्राहकाचा धक्कादायकरित्या मृत्यू झाला आहे. बीना जिजू पॉल (वय-४६ वर्ष) असं या महिलेचं नाव असून, या दुर्घटनेची सीसीटीव्ही दृश्ये प्रसिद्ध झाली आहेत. अनेकदा बँका, दुकानं किंवा मोठ्या कार्यालयांना काचेचे दरवाजे असतात. काचा स्वच्छ असल्याने दरवाजा बंद आहे का उघडा हे कळत नाही. यातून काहीजण या काचेच्या दरवाज्यावर आदळतात. आपणही असे काही प्रसंग नक्की पाहिले असतील. बीना ही देखील बँकेबाहेर घाईघाईने जात होती आणि ती दरवाजावर जोरात आदळली.

केरळमधील पेरंवबूर तालुक्यातील कुवापाडीमधल्या एका बँकेमध्ये हा दुर्दैवी प्रकार घडला आहे. बीना इथल्या बँकेमध्ये कामासाठी आली होती. बँकेत आल्यानंतर तिला आठवलं की तिच्या स्कूटरची चावी स्कूटरलाच राहिली आहे. ती धावत निघाली होती, आणि तिला काचेच्या दरवाजाचा अंदाज आला नाही. ती या दरवाजावर वेगाने आदळली. बीना दरवाजावर आदळल्याने दरवाजाच्या काचा तुटल्या. जबर जखमी झालेली बीना हिला काही सेकंद काय झालं हे कळालंच नाही, मात्र तिला थोडावेळाने रक्तस्त्राव होत असल्याची जाणीव झाली. तिला एका माणसाने बँकेतील खुर्चीवर बसण्यासाठी मदत केली. ती खुर्चीपर्यंत चालत जात असताना रक्त जमिनीवर ओघळायला लागलं होतं. बीनाची काही मिनिटांनी शुद्ध हरपली, तिला बँकेतील लोकांनीच रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.

आपली प्रतिक्रिया द्या