कर्जमाफी होऊनही लाभ मिळेना, बायपास झालेल्या शेतकऱ्याची बँकेने उडवली खिल्ली

100

सामना प्रतिनिधी, बीड

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत आपणास कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. आपली कर्ज माफी झाली आहे, आपल्या हिश्श्याची रक्कम बँकेत जमा करा असे पत्र मिळाल्यानंतर खुश झालेल्या एका आजारी शेतकऱ्याची मात्र बँकेकडून खिल्ली उडवण्यासारखा प्रकार घडला आहे. आजारी असताना शेतकरी आपल्या हिश्श्याचे पैसे भरायला बँकेत गेला, मात्र अजून काही ठरले नाही पुन्हा बघू म्हणत त्याला उडवून लावल्याचा प्रकार वडवणीमध्ये येथे घडला आहे.

वडवणी जवळील कान्हापुर येथील शेतकरी कारभारी लवटे यांना स्टेट बँक व्यवस्थापकाच्या सहीचे एक पत्र गेले. या पत्रात आपणास छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेचा लाभ मिळाला आहे. आपली कर्ज माफी झाली आहे. एक लाख एकवीस हजार चारशे रुपये मंजूर करण्यात आले आहेत. हा लाभ घ्यायचा असेल तर आपल्या हिश्श्याची 8 हजार 532 रु भरणा करा आणि माफीमध्ये या. तसेच नवीन पीक कर्ज उचलून बँकेच्या आकर्षक पीक कर्ज योजनेचा लाभ घ्यावा असे पत्र देण्यात आले. आजारी असलेले आणि बायपास शस्त्रक्रिया झालेले कारभारी लवटे आजारी असताना आपल्या हिश्श्याची रक्कम भरण्यासाठी बँकेत गेले. मात्र तिथे उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली, तसे अजून काही ठरले नाही पुन्हा बघू म्हणत शेतकऱ्याची खाल्ली उडवली. आधीच बायपास झाली आजारी असताना बँकेच्या रांगेत उभा राहून अखेर या शेतकऱ्याला पिटाळून लावल्याने या शेतकऱ्याचा रक्तदाब वाढल्याची घटना घडली. कर्ज माफी झाली नाही तर मग बँक व्यवस्थापकांनी शेतकऱ्याला पत्र कसे पाठवले हा प्रश्न उपस्थित होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या