
कथित बँक कर्जाच्या फसवणुकीशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालया (ईडी) ने बुधवारी श्री शिव पार्वती साखर कारखान्यासह त्याच्या सहयोगी कंपन्यांमध्ये छापेमारी केली. मुंबई, कर्जत, बारामती आणि पुणे येथे ईडीकडून छापे टाकण्यात आले. या छापेमारीत 19.50 लाख रुपयांच्या रोख रकमेसह संशयास्पद कागदपत्रे, डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.
श्री शिव पार्वती साखर कारखाना, हायटेक इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन इंडिया आणि त्यांचे संचालक नंदकुमार तासगावकर, संजय आवटे आणि राजेंद्र इंगवले यांच्या कार्यालयात ही छापेमारी करण्यात आली.
श्री शिव पार्वती साखर कारखाना लिमिटेडने बँकांकडून 100 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र या कर्जाची 71.19 कोटी रक्कम कारखाना व्यवस्थापनाने फेडली नाही. याबाबत बँकेने तपास केल्यानंतर धक्कादायक बाबी समोर आल्या. साखर कारखान्याने तासगावकर कन्स्ट्रक्शन लिमिटेड, तासगावकर इंडस्ट्रीज लिमिटेड आणि त्यांच्या सहयोगी हायटेक इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन इंडिया या नावाने कंपन्या तयार करुन तिकडे पैसे वळते केले.
यानंतर पंजाब नॅशनल बँकेने श्री शिव पार्वती साखर कारखान्याचे संचालक आणि त्यांच्या सहयोगी कंपन्यांविरोधात अफरातफर, फसवणूक करणे आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याचा आरोप करत सीबीआयकडे एफआयआर नोंदवली.
बँकेने दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने प्रकरणाचा तपास सुरु केला. मात्र हे मनी लाँड्रिंगचे प्रकरण असल्याने हा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला. सीबीआयने साखर कारखाना आणि त्याच्या सहयोगी कंपन्यांच्या कार्यालयात छापेमारी करत बनावट कागदपत्रांसह 19.50 लाख रुपये जप्त केले.