
गॅस कटरने खिडकी, लॉक तोडून विदर्भ-कोकण ग्रामीण बँकेच्या पंढरपूर तालुक्यातील गादेगाव शाखेत चोरी झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीला आली आहे. यात 3 लाख 2 हजार रुपये रोख व 2 लाख रुपयांचे सोने असा 5 लाख 2 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
विदर्भ-कोकण ग्रामीण बँकेची पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथे शाखा असून, शुक्रवारी (दि. 23) सायंकाळी सहा वाजता बॅँक बंद झाली होती. शनिवार, रविवारची सुट्टी असल्याने सोमवारी सकाळी 9.30 वाजता कर्मचाऱयांनी बॅँक उघडली. त्यावेळी इमारतीच्या पाठीमागील लोखंडी खिडकी गॅस कटरने कट केल्याचे तसेच बॅँकेत चोरी झाल्याचे निदर्शनास आले. खिडकी कट करून बॅँकेत आलेल्या चोरटय़ांनी वीजपुरवठा, सीसीटीव्ही कनेक्शन, बॅटरी वायर कट केल्याचे तसेच गॅस कटरचा उजेड खिडक्यातून बाहेर जावू नये, यासाठी खिडक्यांना कपडे लावल्याचे दिसून आले.
घटनेची माहिती मिळताच, पंढरपूर तालुका, पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनची तपास पथके घटनास्थळी दाखल झाली. चोरटय़ांनी बॅँकेतील लॉकर गॅस कटरने कट केल्याचे समोर येत आहे. खिडकीजवळ दारूची बाटली आढळून आली आहे. बॅँकेतील तसेच गावातील विविध रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात येत आहेत.
पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव व उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे.
एकाच बँकेत दुसऱयांदा चोरी
विदर्भ-कोकण ग्रामीण बॅँकेच्या गादेगाव शाखेत चोरीचा प्रकार दुसऱयांचा घडला आहे. तीन वर्षांपूर्वी खिडकी तोडून चोरटय़ांनी बॅँकेत घुसून तोडफोड केली होती. त्यानंतर आता सोमवारी पुन्हा चोरीची घटना घडली आहे. बॅँकेच्या पाठीमागे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे, तर उत्तर बाजूला बीएसएनलची इमारत आहे. श्वान या परिसरात घुटमळून परत बॅँकेच्या ठिकाणी आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.