10 वर्षांच्या मुलाने बँकेतून 10 लाख रुपये पळवले

1492
crime

इंदूरमधल्या एका बँकेतून 10 लाख रुपये चोरण्यात आले आहेत. सीसीटीव्ही दृश्ये तपासली असता पोलिसांना ही रक्कम एका लहान मुलाने चोरल्याचे दिसून आले. हा मुलगा अवघ्या दहा वर्षांचा असावा असे दृश्यातून दिसत आहे. लहान मुलाने एवढी मोठी रक्कम चोरून नेल्याने पोलीसही अवाक झाले आहेत. या मुलाला चोरी कोणी करायला लावली याचाही पोलिसांना शोध लावावा लागणार आहे.

मंगळवारी सकाळी 11 च्या सुमारास हा लहान मुलगा साधे कपडे घालून बँकेत शिरतो आणि थेट कॅशिअरच्या कक्षात घुसतो असं दृश्यात दिसलं आहे. मध्य प्रदेशातील नीमच जिल्ह्यातील जावड भागात असलेल्या सहकारी बँकेमघ्ये हा प्रकार घडला आहे. हा मुलगा कॅशिअरच्या केबिनसमोर ग्राहकांची रांग असतानाही आत शिरला आणि नोटांची 2 बंडले त्याच्याकडे असलेल्या थैलीत भरून फरार झाला. हा मुलगा बँकेतून बाहेर पळत असताना लोकांना काहीतरी गडबड असल्याची शंका आली, ज्यामुळे त्यांनी आरडाओरडा केला मात्र तोपर्यंत हा मुलगा पळून गेला होता.

कॅशिअरची केबिन उंच असल्याने हा मुलगा त्या आड सहजपणे लपू शकला होता. यामुळेच पलिकडे उभ्या असलेल्या ग्राहकांना तो दिसला नाही. सीसीटीव्ही तपासत असताना पोलिसांना त्यामध्ये बँकेबाहेर एक माणूस घुटमळताना आणि या लहान मुलाला सूचना देत असताना दिसला होता. कॅशिअर त्याच्या जागेवरून उठला तेव्हा त्याने या मुलाला इशारा केला, ज्यानंतर हा मुलगा बँकेत घुसला आणि त्याने पैसे चोरून धूम ठोकली. पैसे चोरल्यानंतर हा माणूस आणि मुलगा वेगवेगळ्या दिशांना पळाले.

पोलिसांनी या घटनेच्या चौकशीदरम्यान अनेक संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानदारांचीही पोलिसांनी चौकशी केली आहे. बँकेच्या सुरक्षा रक्षकाचीही पोलिसांनी कसून चौकशी केली आहे. पोलिसांना संशय आहे की पैसे चोरणाऱ्या टोळीने बँकेची काही दिवस बारीक पाळत ठेवून पाहणी केली असावी आणि नंतर पैसे चोरले असावेत.

आपली प्रतिक्रिया द्या