साई संस्थानकडे जमा होणारी सुटी नाणी घेण्यास बँकांचा नकार

सामना प्रतिनिधी, शिर्डी

सुट्या नाण्यांचा प्रश्न अनेक व्यापाऱ्यांना सतावतोय अशातच बँका सुद्धा सुटी नाणी स्वीकारायला तयार नसताना याचा फटका आता शिर्डीच्या साई संस्थानला सुद्धा बसलाय. देशभरातून आलेले साई भक्त साईंच्या चरणी आपल्या आर्थिक ताकदीप्रमाणे दान करतात यात सुटी नाणी हुंडीत टाकणाऱ्या भक्तांची संख्याही अधिक असून आता यापुढे साई संस्थान मधील सुटी नाणी स्वीकारणार नसल्याचं बँकांनी सांगितल्यान संस्थान समोर मोठा प्रश्न उभा राहिलाय.

शिर्डीचे साईबाबा देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते.. रोज हजारो भाविक साईबाबांच्या दर्शनाला हजेरी लावतात व आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार दानही करतात. कोणी हिरे, कोणी सोन चांदी तर कोणी मोठमोठ्या देणगी देतात. याशिवाय साईना मानणारा सर्वसामान्य वर्ग मोठा असून हे साईभक्त आपल्या जवळील सुटी नाणी दान स्वरूपात हुंडीत टाकतात. दर आठवड्यातून दोन वेळा या दानाची मोजदाद करण्यात येते. मात्र गेल्या वेळी झालेल्या दानाच्या मोजणीनंतर बँक अधिकाऱ्यांनी दान स्वरूपात मिळालेली सुटी नाणी स्वीकारण्यास असमर्थता दर्शविली असून सुटी नाणी ठेवायला बँकेत जागा नसल्याचं संस्थानला सांगितलंय.

काल झालेल्या दानाच्या मोजणीत संस्थानला आलेली तब्बल सात लाख रुपयांची सुटी नाणी बँकेने नेली नसून केवळ रोख रक्कम स्वरूपात मिळालेली रोकड बँकेत जमा केलीय. विविध 8 बँकेतील अधिकारी दरवेळी दान मोजणीला हजेरी लावत असतात. मात्र सर्वच बँकांनी सुटी नाणी स्वीकारण्यास असमर्थता दर्शविल्यानं साई संस्थांच्या वतीनं रिजर्व्ह बँकेला पत्र पाठविण्याचा निर्णय घेतला असून आठवड्यातून दोन वेळा दान स्वरूपात जमा होणारी सुटी नाणी करायची काय असा प्रश्न निर्माण झालाय. दरम्यान यावेळी साई भक्तांनी या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली असून नाणी सुद्धा चलनातील असून असा निर्णय घेऊ नये असं म्हटलं आहे.
– दीपक मुगळीकर कार्यकारी अधिकारी, साई संस्थान, शिर्डी