अमेरिकन पर्यटकांनाही बाप्पाची भुरळ; विसर्जन सोहळ्याचा लुटला आनंद

गणपती बाप्पाचे मनमोहक रूप आबालवृद्ध अशा सर्वांनाच आकर्षित करते. गणपती बाप्पाच्या मनमोहक रूपाची भुरळ अमेरिकेतून रत्नागिरीत आलेल्या दोन पर्य़टकांनाही पडली आहे. अमेरिकेतून आलेले हे दोघेजण मांडवी समुद्रकिनारी गणपती विसर्जन सोहळ्यात सहभागी झाले होते.

अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पांना वाजत-गाजत भक्तीभावात निरोप देण्यात आला. रत्नागिरीतील मांडवी समुद्रकिनारी गणपती विसर्जन सोहळा झाला. या विसर्जन सोहळ्यात दोन विदेशी नागरिक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. जोएल आणि टेलर हे आठवडाभरापूर्वीच हिंदुस्तानात आले आहेत. तीन दिवस गणपतीपुळे येथे मुक्काम केल्यानंतर गुरुवारी ते दोघे रत्नागिरीत आले. त्यावेळी ते फिरत फिरत मांडवी समुद्रकिनाऱ्यावर आले. त्यावेळी मांडवी किनाऱ्यावर विसर्जन सोहळा सुरू होता. गणपतीबाप्पाचे मनमोहक रूप पाहून त्या दोघांनाही त्याची भुरळ पडली. किनाऱ्यावर सुरू असलेल्या बाप्पाच्या आरतीमध्ये टाळ्या वाजवत ते सहभागी झाले. त्यांनी आरतीनंतर भक्तीभावाने प्रसादही घेतला. त्यानंतर बाप्पाच्या मूर्तीसह विसर्जनासाठी समुद्रात उतरत त्यांनी गणेश विसर्जनाचा सोहळा अनुभवला.

मांडवी समुद्रकिनारी गणपती विसर्जन सोहळ्यात सहभागी झालेल्या जोएल आणि टेलर संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की,आम्हाला या उत्सवाविषयी काही माहित नव्हते.आम्ही फिरत इथे आलो तेव्हा आम्हाला हा उत्सव पहायला मिळाला.आम्ही हे सर्व पाहून आनंदी झालो.खूप एन्जॉय केला. प्रसादाचाही आस्वाद घेतला खूप छान वाटले. असा आगळावेगळा सोहळा आमच्या कायम स्मरणात राहील, असे ते म्हणाले.