राजकीय सूडभावनेतून ‘बारामती ऍग्रो’वर कारवाई, उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांचा आरोप

बारामती ऍग्रो साखर कारखान्याने कुठल्याही नियमांचे उल्लंघन केलेले नाही. केवळ राजकीय सूडभावनेतून कारखान्यावर कारवाई करण्यात येत आहे. शेतकऱयांसाठी चांगले काम करणारा हा कारखाना पुढील काळातदेखील असेच चांगले काम करत राहणार असल्याचे प्रतिपादन बारामती ऍग्रो कारखान्याचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी केले आहे.

आमदार रोहित पवार सीईओ असलेल्या बारामती ऍग्रो साखर कारखान्याने परवानगीच्या अगोदर पाच दिवस सुरू करण्यात आला. हे करताना कारखान्याने शासनाच्या नियमांची पायमल्ली केली. यामुळे संबंधित कारखान्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आमदार राम शिंदे साखर आयुक्तांकडे केली होती.

सुभाष गुळवे म्हणाले, बारामती ऍग्रोने नियमांचे उल्लंघन केलेले नाही. तक्रारीनंतर साखर आयुक्त यांनी पाहणी करून ‘क्लीन चिट’ दिलेली आहे. मात्र, केवळ सत्तेचा दुरुपयोग करत कारखान्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. बारामती ऍग्रो, जय श्रीराम, हळगाव व अंबालिका शुगर या कारखान्यांमुळे कर्जत व जामखेड तालुक्यातील शेतकऱयांचा फायदा झाला आहे. हे सहन न झाल्याने केवळ राजकीय द्वेष मनामध्ये ठेवून राम शिंदे यांनी ही कारवाई घडवून आणली आहे.