देशविदेश…गरमागरम Barbeque

17572

मीना आंबेरकर

बार्बेक्यू पदार्थ… मोठय़ा पंचतारांकित हॉटेल्समध्ये हे खास दिले जातात… पण आधुनिक संस्कृतीचे मूळ अरण्यातील खाद्यसंस्कृतीकडे जाते…

वन किंवा अरण्य हा आजच्या फुलोराचा विषय आहे. ‘अरण्य’ हा विषय तसा आगळावेगळा आहे. पूर्वीच्या काळच्या साहित्यातून निबीड अरण्याचे उल्लेख आढळतात. वर्तमान युगात माणसांनी चालवलेल्या वृक्षतोडीमुळे अरण्यं किंवा दाट जंगलं ही मुद्दाम शोधून काढावी लागतात. तसं पाहिल्यास आपली आदिम संस्कृती ही अरण्यातूनच निर्माण झालेली आहे. आदिमानव हा अरण्यात वास्तव्य करत होता. निसर्गाच्या सान्निध्यात त्याचा वावर होता. आदिमानव टोळी टोळीने वस्ती करून राहात होता. जंगलात वाढणारी कंदमुळे झाडपाला हे त्याचे खाद्य होते. तसेच जंगलात वावरणारे प्राणी-पक्षी यांची शिकार करून तो आपली भूक भागवत होता. अग्नी निर्माण करण्याचे तंत्र त्याने अवगत केले होते. थंडीवाऱयापासून रक्षण करण्यासाठी त्याला विस्तवाची गरज होती. कारण वस्त्र  त्याला माहीत नव्हती. तसेच मिळालेली शिकार योगयोगाने विस्तवावर पडली आणि ते भाजलेले मांस त्याला चविष्ट लागले तेव्हापासून तो आपली शिकार विस्तवावर भाजून खाऊ लागला मग कंदमुळे खातानाही तो विस्तवावर भाजून खाऊ लागला. इथेच भाजलेले अन्न खाणे ही खाद्यसंस्कृती आहे. ही खाद्यसंस्कृती गावागावातून जोपासत येऊन तिला शहरी खाद्यसंस्कृतीतही स्थान मिळाले आहे. गावागावातून शेतात पिकणाऱया कंदभाज्या शेंगभाज्या मातीच्या मडक्यात घालून ते मडके जमिनीत खड्डा करून आत ठेवत. वरून पालापाचोळा घालून जाळ निर्माण करून आतील भाज्या भाजून नंतर त्यांचा आस्वाद घेतला जाई.

आजही मोठमोठय़ा हॉटेल्स किंवा रेस्टॉरण्टसमधून ही बार्बेक्यू संस्कृती पाय रोवून आहे. आपण आज काही बारबेक्यूच्या रेसिपीज पाहूया.

paneer-tikka

पनीर टिक्का

साहित्य…दूध २ लिटर, आले लसणाची पेस्ट, २ चमचे हिरवी मिरची पेस्ट, २ चमचे कोथिंबीर, ४ चमचे मीठ चवीनुसार, लिंबू १, सरसोचे तेल ४ चमचे.

कृती..दूध उकळून थोडे आटवा. त्यामध्ये आले-लसूण-मिरची पेस्ट घालून पुन्हा उकळवा. शेवटी लिंबू पिळून दूध फाडा. गरम असताना मलमलच्या कापडामध्ये घालून बांधून ठेवा. थोडासा दाब देऊन नंतर थंड पाण्यात ५-१० मिनिटे ठेवा. नंतर हलक्या हाताने वडय़ा पाडून त्याला लिंबूरस, मीठ, सरसोंचे तेल लावून १८० अंश सेल्शियसवर ओव्हनमध्ये भाजून घ्या.

veg-barbeq

व्हेज बार्बेक्यू

साहित्य.. ४ मध्यम टोमॅटो, ४ सिमला मिरची, ४ छोटे बटाटे, ८-१० कोवळी भेंडी, २ रताळी मध्यम तुकडे करून, २ कच्ची केळी साल काढून मध्यम तुकडे करून, चवीनुसार मीठ, मलईचे दही सव्वा वाटी, बडीशेप पावडर दीड चमचा, २ चमचे लाल तिखट, २ चमचे भाजून तिळाची पावडर, जाडे बेसन २ मोठे चमचे, धणा-जिरा पावडर दीड चमचा अर्धा चमचा आमचूर पावडर, दोन चमचे तेल.

कृती …सर्व भाज्या धुऊन पुसून मध्ये चिर देऊन ठेवाव्यात, दह्यात सर्व मसाला, मीठ तिखट एकजीव करून साधारण घट्ट मिश्रण तयार करावे. भाज्यांमध्ये मिश्रण भरून बारबेक्यू डिशला तेल लावून त्यात त्या भाज्या रचून ठेवाव्यात. २५०0 अंश सेल्शियस तापमानावर ओव्हनमध्ये अर्धा तास भाजून काढाव्यात. कांदा चटणीबरोबर सर्व्ह कराव्यात.

black-paper

काळी मिरी टिक्का

 साहित्य..बोनलेस चिकन अर्धा किलो, मिरे १२-१५, कांदे ४, आले १ इंच, लसूण ७-८ पाकळय़ा, हिरव्या मिरच्या २-३ तेल ४३ चमचे, सिमला मिरची १ मध्यम, चक्का १ कप, साय ३ चमचे, मक्याचे पीठ १ चमचा, एका अंडय़ातील पांढरे, गरम मसाला अर्धा चमचा, मीठ चवीनुसार, वेलची पूड पाव चमचा, लोणी चोळण्यासाठी.

कृती..चिकन स्वच्छ धुऊन साधारण दीड इंची तुकडे करावेत. हे तुकडे कोरडे करून घ्यावेत. मिरी कोरडीच भाजून जाडी भरड पावडर करून घ्यावी. कांदे चिरलेले, आले- लसूण पेस्ट करावी. मिरच्यांची पेस्ट करावी. कढईत तेल टाकून कांदा गुलाबी रंगावर परतावा. गार झाल्यावर मिक्सरमध्यें वाटावा. सिमला मिरचीच्या बिया काढून एक इंचाचे तुकडे करावेत. एका मोठय़ा वाडग्यात कांद्याचे वाटण, चक्का, साय, मक्याचे पीठ, अंडय़ातील पांढरे, आले, लसूण, मिरची पेस्ट, गरम मसाला, सिमला मिरची, मीरपूड, मीठ, वेलची पूड असे सर्व एकत्र करावे. त्यात चिकनचे तुकडे घालून सर्व एकत्र कालवावे. तासभर मुरण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवावे. ओव्हन १८० अंश सेल्शियसला तापवून ठेवावा. एका सळईला चिकनचे तुकडे व सिमला मिरचीचे तुकडे टोचून ठेवावेत. २५० अंश सेल्शियस तापमानात पंधरा मिनिटे ओव्हनमध्ये शिजवावेत. मधूनमधून त्याच्यावर लोणी चोळावे. कांद्याच्या चकत्या आणि पुदिन्याच्या चटणीबरोबर गरम गरम सर्व्ह करावेत.

 

आपली प्रतिक्रिया द्या