नगर परिषदेच्या कचरा वाहणाऱ्या घंटागाडीतून नेला मृतदेह; परळीतील धक्कादायक प्रकार

बीड जिल्ह्यातील परळी येथील बरकतनगर रेल्वे क्रॉसिंगवर अवयव तुटलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. हा मृतदेह नगरपालिकेच्या कचरा वाहतूक करणाऱ्या घंटागाडीतून उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आल्‍याचा धक्‍कादायक प्रकार बुधवारी घडला.

परळीतील बरकतनगर रेल्‍वे क्रॉसिंगवर तब्बल 3 तास मृतदेहाचे अवयव रेल्वे पटरीवर पडून होते, मात्र उशिराने जाग आल्यानंतरही नगर पालिकेकडून मृतदेहाची अहवेलना करण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे परळी शहर अन्‌ परिसरात कुणी आत्महत्या केली अथवा अपघात झाला तर अशाच स्वरूपात कचऱ्याच्या घंटागाडीतून मृतदेह रुग्णालयात नेण्यात येते, अशी माहितीदेखील उघडकीस आली आहे.

हैदराबाद – औरंगाबाद रेल्वेसमोर आल्याने आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास परळी येथील प्रियदर्शनी बँकेत कॅशिअर म्हणून काम करणारे शिवाजी श्रीपती कुटे (45, रा. कुटेवाडी ता. बीड) हे जागीच ठार झाले. विशेष म्हणजे यावेळी त्यांचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अन्‌ अवयव तुटलेल्या अवस्थेत रेल्वे पटरीवर पडून होता. यामुळे परळी-मिरज रेल्वे दोन तासांपासून अधिक उशीर होऊन स्थानकात थांबली.

अपघात होऊनदेखील रेल्वे पोलिसांनी मृतदेहावर कापडही घातले नाही. त्यानंतर सकाळी साडेनऊ ते दहाच्या दरम्यान नगरपालिकेचे काही कर्मचारी त्या ठिकाणी गेले आणि मृतदेहाचे अवयव गोळा करून त्यांनी एका कचरा वाहतूक करणाऱ्या घंटागाडीतून हा मृतदेह परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात आणला. नेमके या प्रकरणात चूक कुणाची झाली आणि त्यावर कोण कारवाई करणार, अशी चर्चा नागरिकात सुरू होती.