राजकीय दबावामुळेच पोलीस आरोपींना पाठीशी घालताहेत!आम्ही न्याय कोणाकडे मागायचा? बार्शीतील पीडित मुलीच्या आईचा टाहो

राजकीय दबावामुळेच पोलीस नराधम आरोपींना पाठीशी घालत आहेत. आमची विचारपूस न करता प्रसारमाध्यमांवर मत व्यक्त करणाऱया भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आमची बदनामी केली आहे, असा आरोप करीत न्यायासाठी बार्शीतील पीडितेच्या आईने टाहो पह्डला आहे. माझ्या मुलीवर अत्याचार करून हत्येचा प्रयत्न करणाऱया नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणीही पीडितेच्या आईने केली आहे.

बार्शी तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर दोघा नराधमांनी अत्याचार करून हत्येचा प्रयत्न केला. या भयंकर घटनेने सर्वत्र खळबळ उडाली. याबाबत आता पीडितेच्या आईने आपली व्यथा व्यक्त केली आहे. अत्याचार करणाऱया तरुणांना राजकीय संगनमतातून पोलीस अभय देत असल्याचा आरोप या पीडितेच्या आईने केला आहे. अत्याचारानंतर फिर्याद देण्यासाठी गेलो असताना बार्शी शहर व तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्याने मोकाट असलेल्या आरोपींनी पुन्हा माझ्या मुलीवर अत्याचार करून जीवघेणा हल्ला केला. यात तिची बोटे छाटली. डोक्यावर-माथ्यावर वार केले. या हल्ल्यातून मुलगी बचावली. मुलीवर अत्याचार करून हत्येचा प्रयत्न करणाऱया नराधम आरोपींना राजकीय दबावापोटी पोलीस पाठीशी घालत आहेत. माझ्या मुलीसह आमचा आई-वडील म्हणून जबाब घेणे आवश्यक होते. परंतु, जबाब घेण्यात आला नाही. तपासात विसंगती ठेवण्यासाठी नियोजित कट करण्यात आला आहे, असा आरोप करीत आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणीही आईने केली.

खासदार संजय राऊत यांनी आवाज उठविला; मात्र पोलिसांनी त्यांच्यावरच गुन्हा दाखल केला

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी आमच्यावर झालेल्या अन्यायाची दखल घेतली. मात्र, नराधम आरोपींवर कारवाई होण्याऐवजी त्यांच्यावरच गुन्हा दाखल झाला, हा कुठला न्याय? अशाने आम्हाला न्याय कसा मिळणार? असा सवाल पीडितेच्या आईने केला. खासदार संजय राऊत हे आम्हाला न्याय मिळावा, यासाठी लढत आहेत. त्यांनी पह्नवरून संपर्क साधत आम्हाला धीर तर दिलाच; पण सोलापुरात येऊन भेट घेणार असल्याचेही सांगितले, असे पीडितेची आई म्हणाली.