पार्थ पवार यांचे जमीन प्रकरण, 42 कोटींची स्टॅम्प ड्युटी भरावीच लागेल; चंद्रशेखर बावनकुळे यांची पलटी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांनी केलेला पुण्यातील कोरेगाव पार्क जमीन व्यवहार सरकारी मालमत्तेशी संबंधित आहे. हा व्यवहार तांत्रिकदृष्ट्या रद्द करावा लागेल, मात्र हा व्यवहार रद्द करताना संबंधितांना एकूण 42 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरावीच लागेल, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज स्पष्ट केले. बावनकुळे यांनी कालच 42 कोटी भरावे लागणार नाही असे वक्तव्य केले होते.

बावनकुळे आज म्हणाले, या व्यवहाराची तपासणी केल्यावर लक्षात आले की, नोंदणी आणि मुद्रांक विभागाने हा व्यवहार तपासून योग्य ती कारवाई केली आहे. व्यवहाराची मूळ रक्कम 300 कोटी रुपये दाखवण्यात आली होती. त्यावर 21 कोटींची स्टॅम्प ड्युटी आकारण्यात आली. आता हा व्यवहार रद्द करण्यासाठी रिकन्वेअन्स करताना त्याचप्रमाणे अजून 21 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी द्यावी लागेल. म्हणजेच एकूण 42 कोटी रुपये भरावे लागतील.

सरकारकडे जमीन परत करावी लागेल

‘हा व्यवहार तांत्रिकदृष्ट्या चुकीचा झाला आहे. सरकारकडे ती जमीन परत घ्यावी लागेल. मात्र ज्या रकमेवर व्यवहार दाखवला आहे त्यावर मुद्रांक शुल्क आकारणे हे मुद्रांक अधिनियमातील नियमांप्रमाणे बंधनकारक आहे. टायटलला यात अर्थ नाही; व्यवहार मुद्रांक अधिकाऱ्यांकडे जातो तेव्हा दाखवलेली रक्कम महत्त्वाची असते,’’ असे नोंदणी व मुद्रांक महानिरीक्षकांनी स्पष्ट केले आहे.