
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बीबीसीने तयार केलेल्या डॉक्युमेंट्रीवरून देशाच्या अनेक भागात वाद उफाळून आला आहे. गुरुवारी हैदराबाद विद्यापीठामध्ये स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाने ही डॉक्युमेंट्री दाखवण्याचा निर्णय घेतला होता. याला उत्तर म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने द कश्मीर फाईल्स हा चित्रपट दाखवला. यानंतर या दोन्ही विद्यार्थी संघटनांमध्ये किरकोळ हाणामारी झाल्याचे वृत्त आहे.
हैदराबाद विद्यापीठात एसएफआयने बीबीसीची डॉक्युमेंट्री दाखवण्याचं ठरवल्यानंतर अभाविपने इथे द कश्मीर फाईल्स दाखवण्याचं ठरवलं होतं. यावरून दोन्ही विद्यार्थी संघटनांचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. एसएफआयने दावा केला आहे की त्यांनी विद्यापीठात जेव्हा ही डॉक्युमेंट्री दाखवली तेव्हा जवळपास 400 विद्यार्थ्यांनी ती पाहिली. 21 जानेवारी रोजी काही विद्यार्थ्यांनी बीबीसीच्या डॉक्युमेंट्री दाखवली होती,ज्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने परवानगीशिवाय कोणतीही डॉक्युमेंट्री दाखवू नये असे आदेश दिले होते. बीबीसीच्या या डॉक्युमेंट्रीला प्रचारकी म्हणत केंद्र सरकारने यावर बंदी घातली आहे. असं असतानाही ही डॉक्युमेंट्री देशाच्या अनेक भागात दाखवली जात आहे. काँग्रेस, डावे पक्षांशी संलग्न संघटना यांकडून ही डॉक्युमेंट्री दाखवली जात आहे.