वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, विराटच तिन्ही फॉरमॅटचा कर्णधार

24
virat-kohli-shikhar-dhawan

सामना प्रतिनिधी । मुंबई

पुढील महिन्यात सुरू होणाऱया वेस्ट इंडीज क्रिकेट दौऱयासाठी टीम इंडियाच्या तीन वेगवेगळ्या संघांची घोषणा रविवारी वानखेडे स्टेडियमवरील बीसीसीआय राष्ट्रीय निवड समिती बैठकीत करण्यात आली. अपेक्षेनुसार कसोटी, वन डे आणि टी-20 संघांत जुन्या आणि नव्या क्रिकेटपटूंचा संगम साधण्यात आला आहे. विशेष म्हणजे तीनही संघांचे नेतृत्व विराट कोहलीकडे सोपविण्यात आले आहे. कसोटी संघात उपकर्णधार अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, रविचंद्रन अश्विन, इशांत शर्मा या अनुभवी खेळाडूंसह मयांक अग्रवाल आणि हनुमा विहारी या नवोदितांना संधी देण्यात आली आहे. या दौऱयात टीम इंडिया 3 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या कालावधीत यजमान वेस्ट इंडीजविरुद्ध तीन टी-20, तीन वन डे आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे.

…म्हणून अंबाती रायडूला घेतले नाही!
अंबाती रायुडूला टी-20 क्रिकेटमधील कामगिरीच्या आधारे ‘टीम इंडिया’च्या विश्वचषक संघात स्थान देण्यात आले होते. रायुडूसाठीही आमची एक योजना होती. मात्र, फिटनेस टेस्टमध्ये तो फेल झाल्याने आम्ही रायुडूचा फिटनेस प्रोग्राममध्ये समावेश केला. विजय शंकर जायबंदी झाला होता. लोकेश राहुललाही झेल घेताना दुखापत झाली होती. त्यामुळे सलामीचा पर्याय म्हणून आम्ही मयांक अग्रवालला पसंती दिली. असा खुलासा संघनिवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी केला.

बीसीसीआय राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष एम. एस. के. प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये रविवारी एक महिन्याच्या वेस्ट इंडीज दौऱयासाठी टीम इंडियाचे तीन वेगवेगळे चमू घोषित करण्यात आले. बैठकीला कर्णधार विराट कोहलीही उपस्थित होता. माजी कर्णधार आणि यष्टिरक्षक महेंद्रसिंह धोनीने दोन महिने क्रिकेटमधून विश्रांती घेण्याची घोषणा शनिवारीच केली असल्यामुळे त्याचे नाव संघनिवडीसाठी विचारात घेण्यात आले नाही. त्याऐवजी युवा यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंतला तिन्ही फॉरमॅटसाठी यष्टिरक्षक म्हणून तर अनुभवी रिद्धिमान सहाला दुसरा यष्टिरक्षक म्हणून संधी देण्यात आली.

मनीष पांडे, श्रेयस अय्यरवर सर्वांच्या नजरा
वेस्ट इंडीज ‘अ’ संघाविरुद्धच्या मालिकेत धडाकेबाज कामगिरी करणारा हिंदुस्थान ‘अ’ चा कर्णधार मनीष पांडे आणि धडाकेबाज फलंदाज श्रेयस अय्यर आता सीनियर संघातून वन डे आणि टी -20 त कशी कामगिरी करतात याकडे निवड समितीसह सर्वांचेच लक्ष लागले आहे. तर कसोटीत मयांक अग्रवाल सलामीला के. एल. राहुलसोबत किती यश मिळवतो याबद्दलही क्रिकेटशौकिनांना कुतूहल आहे.

रहाणे, पुजारा यांच्या कामगिरीकडे विशेष लक्ष
कसोटी संघांत पुन्हा स्थान मिळवणारे ज्येष्ठ फलंदाज अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा यांच्या फलंदाजीकडे आणि इशांत शर्मा, रविचंद्रन अश्विन आणि उमेश यादव गोलंदाजीत किती यश मिळवतात याबाबतही क्रिकेटशौकिनांना उत्सुकता लागून राहिली आहे.

विविध फॉरमॅटसाठीचे हिंदुस्थानी संघ

वन डे मालिकेचा संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, के. एल. राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत (यष्टिरक्षक), रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद शमी , भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, नवदीप सैनी.

टी-20 मालिकेचा संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, के. एल. राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत (यष्टिरक्षक), रवींद्र जाडेजा, कृणाल पांडय़ा, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, भुवनेश्वर कुमार, खलिल अहमद, दीपक चहर, नवदिप सैनी

कसोटी मालिकेसाठी संघ
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), मयांक अग्रवाल, के. एल. राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रोहित शर्मा, रिषभ पंत (यष्टिरक्षक), रिद्धिमान साहा (यष्टिरक्षक), आर. अश्विन, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, उमेश यादव.

हिंदुस्थान वि. वेस्ट इंडीज- मालिकेचे वेळापत्रक
पहिला टी-20 सामना – 3 ऑगस्ट, रात्री 8 वाजल्यापासून, फ्लोरिडा
दुसरा टी-20 सामना – 4 ऑगस्ट, रात्री 8 वाजल्यापासून, फ्लोरिडा
तिसरा टी-20 सामना – 6 ऑगस्ट, रात्री 8 वाजल्यापासून, गयाना
पहिली वन डे – 8 ऑगस्ट, सायंकाळी 7 पासून, गयाना
दुसरी वन डे – 11 ऑगस्ट, सायंकाळी 7 पासून, त्रिनिदाद
तिसरी वन डे – 14 ऑगस्ट, सायंकाळी 7 पासून, त्रिनिदाद
पहिली कसोटी – 22 ते 26 ऑगस्ट, सायंकाळी 7 पासून, ऑण्टिग्वा
दुसरी कसोटी – 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर, रात्री 8 पासून, जमैका

आपली प्रतिक्रिया द्या