आणखी 5 वर्षे चालणार ‘दादागिरी’, BCCIच्या बैठकीत गांगुलीचा कार्यकाळ वाढवण्याचा निर्णय

745

टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि विद्यमान बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याचा कार्यकाळ किमान 5 वर्षे वाढवण्याचा महत्वपूर्ण निर्णय हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) रविवारी घेतला. मुंबईतील रविवारच्या बोर्डाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या निर्णयावर शिक्कामोर्तब करून तो अंतिम मंजुरीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवण्यात आला. आता न्यायालयाने या प्रस्तावास मंजुरी दिली तर 2024 पर्यंत गांगुलीची ‘दादागिरी’ बोर्डावर चालणार आहे. अन्यथा 9 महिन्यांचा कालावधी संपल्यावर बोर्डाला गांगुली यांच्या जागी नवा अध्यक्ष बसवावा लागेल.

हिंदुस्थानी क्रिकेटच्या भल्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने लोढा समितीच्या प्रशासनिक नियमांत काहीशी ढील द्यावी अशी मागणी बोर्डाने आजच्या बैठकीत केली. तसा प्रस्तावही बीसीसीआयच्या मुंबईतील 88 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. 2003 च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत हिंदुस्थानला प्रवेश मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलणारा माजी कर्णधार सौरभ गांगुली या सभेच्या अध्यक्षस्थानी होता. मात्र त्याला मुदतवाढ देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम मंजुरीची गरज लागणार आहे.

…तर गांगुली 2024 पर्यंत बीसीसीआयचा ‘बॉस’
बोर्डाने आपल्या बैठकीतील महत्वपूर्ण प्रस्ताव अंतिम शिक्कामोर्तबासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवला आहे. न्यायालयाने मंजुरी दिल्यास आणखी 5 वर्षे गांगुलीच बीसीसीआयच्या प्रमुखपदी राहणार आहे. न्यायालय बोर्डाच्या सुधारित प्रस्तावाला होकार देईल अशी आशा बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांना आहे.

विद्यमान नियम असा आहे
न्यायमूर्ती लोढा समितीने बीसीसीआयच्या कारभारासाठी अनेक नियम घालून दिले आहेत. त्यात सलग 6 वर्षे क्रिकेट प्रशासक म्हणून कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या पदाधिकाऱ्याला त्यानंतर 3 वर्षे ब्रेकचा ( कूलिंग पिरियड ) नियमही आहे. त्यामुळे यंदा 23 ऑक्टोबरला बोर्डाचे अध्यक्षपद स्वीकारणारे सौरभ गांगुली यांना सध्याच्या नियमानुसार 9 महिन्यांनंतर हे पद सोडावे लागेल.मात्र सर्वोच्च न्यायालयाने बोर्डाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतील नियम दुरुस्तीला मंजुरी दिल्यास गांगुलीला आणखी 5 वर्षे अध्यक्षपद भुषवता येईल. म्हणजेच 2024 पर्यंत तो बीसीसीआयचा प्रमुख असेल.

आपली प्रतिक्रिया द्या