स्वयंपाकासाठी वापरलं टॉयलेटचं पाणी, नोएडातील क्रिकेट स्टेडियमवर संतापजनक प्रकार; जगभरात ‘बीसीसीआय’ची झाली नाचक्की

उत्तर हिंदुस्थानात गेल्या दहा दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत असल्याने ग्रेटर नोएडा स्टेडियमवरील न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील कसोटी सामना सलग दुसऱ्या दिवशी रद्द झाला. मात्र खेळाडूंना जेवण्यासाठी बनविण्यात येणाऱ्या स्वयंपाकासाठी चक्क टॉयलेटचं पाणी वापरण्यात संतापजनक प्रकार नोएडा स्टेडियमवर घटला. या किळसवाण्या आदरातिथ्यामुळे जगभरात ‘बीसीसीआय’ची मोठी नाचक्की झाली आहे.

एकीकडे सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे संपूर्ण ग्राउंड स्टाफ मैदानातील पाणी काढण्यात व्यस्त आहे. येथे जागतिक दर्जाच्या सुविधांचाही आभाव दिसत आहे. त्यातच दुसरीकडे आता जेवण करणारा वॉशरूमच्या वॉश बेसिनमध्ये भांडी धुताना दिसला आणि तिथून त्याने स्वयंपाक करण्यासाठी भांड्यात पाणीही भरले. या किळसवाण्या कृत्याचे फोटो आता व्हायरल होऊ लागल्याने ‘बीसीसीआय’च्या श्रीमंतीची लक्तरे आता वेशीवर टांगली केली आहेत.


जागतिक दर्जाच्या सुविधांचा अभाव

ग्रेटर नोएडा स्टेडियममध्ये पावसामुळे दोन दिवसांचा खेळ वाया गेला. रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे मैदानाची दुरवस्था झाली असून नोएडा स्टेडियममध्ये जागतिक दर्जाच्या सुविधादेखील नाहीत. त्यामुळे मैदानावरील कर्मचारी दुसऱ्या दिवशीही खेळपट्टी आणि मैदान कोरडे करू शकले नाहीत. त्यामुळे बीसीसीआयसारख्या श्रीमंत मंडळाच्या स्टेडियमची अशी अवस्था कशी होऊ शकते, असा प्रश्न आता प्रत्येकाच्या मनात येत आहे.