बीसीसीआय अध्यक्ष होताच गांगुलीचे धोनीच्या निवृत्तीवर विधान, म्हणाला…

9824

टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याच्याकडे बुधवारी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदाची जबाबदारी अधिकृतरित्या देण्यात आली. अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सौरव गांगुली याने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्याला महेंद्रसिंह धोनी याच्या निवृत्तीबाबत सवाल विचारण्यात आले.

धोनी इंग्लंडमध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात टीम इंडियाच्या जर्सीमध्ये अखेरचा सामना खेळला होता. सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर धोनीने एकदाही मैदानात पाऊल ठेवलेले नाही. यादरम्यान हिंदुस्थानचा संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर जावून आला आणि घरच्या मैदानावर आफ्रिकेशीही भिडला. परंतु धोनीने या दोन्ही मालिकेतून माघार घेतली. आता बांगलादेशचा संघ हिंदुस्थान दौऱ्यावर येणार असून यातही धोनी खेळण्याची शक्यता कमी आहे. यावरून त्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगू लागल्या. याचसंदर्भात गांगुलीचा सवाल विचारण्यात आला असता त्याने अतिशय सावध उत्तर दिले आहे.

सौरव गांगुलीने बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला

पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना गांगुली म्हणाला की, ‘धोनी हिंदुस्थानच्या क्रिकेटमधील एक महान खेळाडू आहे आणि जोपर्यंत मी आहे तोपर्यंत प्रत्येक खेळाडूचा सन्मान केला जाईल. तसेच जे चॅम्पियन असतात ते लवकर संपत नाहीत’, असे म्हणत त्याने धोनी अद्याप निवृत्ती घेणार नाही यावर शिक्कामोर्तब केला आहे. तसेच धोनीबाबत संघ व्यवस्थापक किंवा निवड समितीशी चर्चा झालीय का असा सवाल विचारण्यात आला असता गांगुली म्हणाला की, ‘मी देखील संघातून बाहेर गेलो तेव्हा अशा चर्चा रंगत होत्या, परंतु मी पुनरागमन केले. महेंद्रसिंह धोनी क्रिकेटमधील मोठा खेळाडू आहे. त्याचे विक्रम पाहून आपसुकच तोंडातून कौतुकाचे शब्द बाहेर पडतात.’

धोनीच्या निवृत्तीवर आम्ही कोणताही निर्णय घेणार नाही. संघ व्यवस्थापक त्याच्यावर निवृत्तीसाठी दबाव टाकणार नाही. निवृत्तीचा निर्णय सर्वस्वी धोनीला घ्यायचा आहे. मी असेपर्यंत सर्वांचा सन्मान करेन, असेही गांगुली यावेळी म्हणाला.

आपली प्रतिक्रिया द्या