एक सामना, दोन वर्ल्ड रेकॉर्ड; BCCI ची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद

बीसीसीआयच्या शिरपेचामध्ये आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. बीसीसीआयने पुन्हा एकदा वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी घातली आहे. टी-20 सामन्यासाठी सर्वाधिक गर्दी जमवण्याचा विक्रम बीसीसीआयच्या नावावर जमा झाला आहे. याची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये झाली आहे. बीसीसीआयने रविवारी ट्विट करून याबाबत माहिती दिली. यासोबत या वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र स्वीकारतानाचा जय शहा यांचा फोटोही बीसीसीआयने शेअर केला आहे.

इंडियन प्रीमिअर लीग 2022 मध्ये अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानात गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स संघात अंतिम सामना खेळला गेला. हा सामना पाहण्यासाठी तब्बल 1 लाख 1 हजार 566 दर्शक मैदानात उपस्थित होते. क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची पहिलीच वेळ होती. बीसीसीआयच्या नावावर या वर्ल्ड रेकॉर्डची नोंद झाली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी ट्विटरवरून याची माहिती दिली आहे.

29 मे, 2022 ला गुजरातच्या नरेंद्र मोदी मैदानात इंडियन प्रीमिअर लीग 2022 चा अंतिम सामना पाहण्यासाठी 1 लाख 1 हजार 556 लोकांची उपस्थिती होती. टी-20 सामना पाहण्यासाठी एवढी गर्दी होण्याची ही पहिलीच वेळ असून याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे, असे ट्विट करत जय शहा यांनी आनंद व्यक्त केला. तसेच पाठिराख्यांचे आभारही मानले.

जर्सीचीही ‘गिनीज बुक’मध्ये नोंद

दरम्यान, आयपीएल 2022 चा अंतिम सामना राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यापूर्वी बीसीसीआयने आपले नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले होते. आयपीएलच्या 15 व्या मोसमाच्या अंतिम सामन्यापूर्वी नरेंद्र मोदी मैदानावर एक महाकाय जर्सी प्रदर्शित करण्यात आली. ही जर्सी जगातील सर्वात मोठी जर्सी ठरली आहे. त्यानंतर या विक्रमाची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली. आयपीएलला 15 वर्षे पूर्ण झाल्यामुळे ही जर्सी बनवण्यात आली आहे. समारोप समारंभात बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, बीसीसीआय सचिव जय शाह आणि आयपीएलचे चेयरमन ब्रिजेश पटेल यांनी ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ चे प्रमाणपत्र घेतले.