
बीसीसीआयच्या कार्यकारिणीची 17 जानेवारीला व्हर्च्युअल बैठक होणार आहे. या बैठकीत या मोसमातील रणजीसह स्थानिक स्पर्धांबाबत, आयपीएलसाठी आयसीसीकडे अधिक दिवस मागण्याबाबत आणि वर्ल्ड कपचे आयोजन करताना करात सूट मिळावी यासाठी कोणते प्रयत्न करण्यात येतील याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
कोरोनामुळे या वर्षी स्थानिक क्रिकेट मोसमाला उशिरा सुरुवात झाली. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीची सुरुवात 10 जानेवारीपासून करण्यात आली. आता या मोसमात आणखी किती स्पर्धा घेण्यात येतील याबाबत या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. फेब्रुवारी महिन्यात रणजी स्पर्धा होण्याची शक्यता आहे. रणजी स्पर्धेसाठी पाच गटांत प्रत्येकी सहा संघ आणि एका गटात आठ संघांना प्रवेश देण्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कर प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न
हिंदुस्थानात या वर्षी टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच 2023 सालामध्ये हिंदुस्थानात वन डे वर्ल्ड कपही खेळवण्यात येणार आहे, मात्र आयसीसीकडून आयोजित करण्यात येणाऱ्या स्पर्धांसाठी केंद्र सरकारकडून करात सूट देण्यात येत नाही. त्यामुळे बीसीसीआय या बैठकीत या प्रकरणावर दृष्टिक्षेप टाकेल. केंद्राने करात सूट दिली नाही तर स्पर्धेमधून मिळणाऱ्या नफ्यामधून कर कापून घेण्यात यावा असे बीसीसीआयकडून आयसीसीला सांगण्यात येईल.