बीडीडी चाळ दुकानदार संघाचा निवडणुकांवर बहिष्कार

बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पामध्ये स्थानिक अधिकृत दुकानदारांवर अन्याय होत असल्याचा आरोप करीत येणाऱ्या सर्वच निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दुकानदार संघटनेने दिला आहे. त्यासाठी संघटनेने क्रमबद्ध आंदोलनाची रूपरेषा आखली असून पहिल्या टप्प्यात दुकाने बंद ठेऊन एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्यात येणार आहे.

बीडीडी चाळ दुकानदार संघटनेची वरळी येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीला जवळपास 350 व्यावसायिकांनी हजेरी लावली. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात अनधिकृत स्टॉलधारक, झोपडपट्टीतील रहिवाशी, स्थानिक रहिवाशी आणि पोलिसांचा सरकारने विचार करून त्यांचे समाधानकारक पुनर्वसन केले. मात्र दुसरीकडे अधिकृत दुकानांवर अन्याय केला जात असून त्यांच्या मागण्यांना केराची टोपली दाखविली जात असल्याचा आरोपही संघटनेने केला आहे.

यासाठी दुकानदारांचा विरोध

रहिवासी गाळेधारकांना 160 चौरस फुटांऐवजी 500 चौरस फुटांची निवासी घरे मिळणार आहेत. दुकानदारांना मात्र 160 चौरस फूट जागेच्या बदल्यात तेवढीच जागा नवीन प्रकल्पात मिळणार आहे.

शिवाय या बदल्यात केवळ 25 हजार एवढेच मासिक भाडे देण्याचे कबूल करण्यात आले आहे. वरळी परिसरात 40 हजार मासिक भाडे असताना 25 हजारांचा तुटपुंजा मोबदला देऊन जबरीने दुकान सोडण्यास सांगण्यात येत आहे.

किमान 300 चौरस फुटांची जागा, स्टॅम्प डय़ुटीत सवलत हवी

किमान 300 चौरस फुटांची जागा, स्टॅम्प डय़ुटीमध्ये सवलत आदी मागण्या दुकानदार संघटनेने राज्य सरकारसमोर ठेवल्या आहेत. स्थानिक व्यावसायिकांच्या समस्या ऐकण्यासाठी अनेकदा शासनास विनंती करण्यात आली, मात्र कोणतीही दाद मिळत नसल्याने पहिल्या टप्प्यात दुकाने बंद ठेवून एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्यात येईल, दुसऱ्या टप्प्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संचालक कार्यालयावर धडक मोर्चा देऊन धरणे आंदोलन करणे व नंतर सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय संघटनेचे अध्यक्ष दिलीप शिंदे, उपाध्यक्ष डॉ. विकास दुबेवार, सचिव राजेश गुप्ता, उपसचिव डॉ. अशोक मौर्य, खजिनदार ललितभाई छेडा व प्रमुख सल्लागार डॉ. अश्विनी राऊत, डॉ. कुमार दुस्सा, किरण शेटये, विशाल भोसले यांनी घेतला आहे.