दहा हजार भरा अन् एका दिवसात डॉक्टर व्हा, तीन भामट्यांवर गुन्हा दाखल

सामना प्रतिनिधी । पुणे

एका संस्थेच्या नावाने संकेतस्थळावरून ‘अवघे १० हजार रुपये भरा अन् डॉक्टर व्हा’ असे आमिष दाखविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तीन भामट्यांवर कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी डॉ. मच्छिंद्र अग्रवाल आणि रत्नपारखी (दोघे रा. संभाजीनगर) व डॉ. अभिजित चव्हाण या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. अभिषेक हरिदास (रा. कोथरूड) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. डॉ. अभिषेक हरिदास हे मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेचे उपाध्यक्ष आहेत. संभाजीनगर येथील निसर्गोपचार बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे संस्थेतस्थळ आहे. त्यावर संस्थेकडून नॅचरोथेरपी डिप्लोमा (एनडी) ही पदवी देत असल्याचे दिसले. ही पदवी घेतल्यास नावापुढे डॉक्टर लावून वैद्यकीय व्यवसाय करता येईल, असा दावा करण्यात आला होता.

हरिदास यांनी यासंदर्भात चौकशी केल्यानंतर त्यांना कोथरूड येथील भुसारी कॉलनीतील रुणवाल समृद्धी अपार्टमेंट येथे १५ एप्रिल रोजी बोलविण्यात आले. त्यावेळी त्यांना एका दिवसात एन. डी. ही डॉक्टरची पदवी देतो, त्यासाठी १० हजार रुपये द्यावे लागतील. ही पदवी मिळाल्यानंतर नावापुढे डॉक्टर लावता येईल असे सांगण्यात आले. हरिदास यांना यामध्ये मोठी गडबड असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी त्वरित कोथरूड पोलिसांकडे जाऊन तक्रार केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कोथरूड पोलीस करत आहेत.

दरम्यान, या भामट्यांचे संभाजीनगर येथे एक कार्यालय असून, पुण्यातही कार्यालय सुरू करण्यात होते. आतापर्यंत त्यांनी कितीजणांना अशा बोगस पदव्या दिल्या आहेत, हे अद्यापि स्पष्ट होऊ शकलेले नाही.

आपली प्रतिक्रिया द्या