‘हे’ पदार्थ खाण्यापूर्वी सावध व्हा, हाडातील कॅल्शियम कमी होऊ शकतं

हाडांच्या मजबुतीकरिता कॅल्शियम आणि जीवनसत्त्व डी  महत्त्वाचे असते. आजच्या धकाधकीच्या जीवनात बऱ्याचदा  कामाच्या व्यस्ततेमुळे खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होते. लोकांना कमी वेळेत बनवलेला पदार्थ खायला आवडतो. काही जण तर घरगुती अन्न खाण्यापेक्षा जंक आणि फास्ट फूडचे सेवन जास्त प्रमाणात करतात, मात्र तळलेले पदार्थ, जंक फूड, अति गोड आणि कॅफिनयुक्त पदार्थांच्या अतिसेवनाचा परिणाम हाडांवर होऊ शकतो. यामुळे ऑस्टिओपोरोसिसची समस्या उद्भवण्याची शक्यता असते. या पदार्थांचे सेवन अजिबात न करणे शक्य नसल्यास त्याचे सेवन अत्यंत कमी प्रमाणात करायला हवे. जाणून घेऊया हाडांमधील कॅल्शियम आणि जीवनसत्त्व डी शोषूण घेणाऱ्या पदार्थांविषयी.

सोडियमयुक्त अन्नपदार्थ

ज्या पदार्थांमध्ये सोडियम जास्त प्रमाणात असतं असे पदार्थ शरीरातील कॅल्शियमचा स्तर कमी करू शकतात. त्यामुळे सोडियमययुक्त पदार्थ विशेषत: हवाबंद डब्यातील अन्नपदार्थ, लोणचे, सोया सॉस, प्रोसेस्ड चीज इत्यादी अति जास्त प्रमाणात खाऊ नयेत. हाडांतील कॅल्शियमच्या कमतरतेमुळे   ऑस्टियोपोरोसिस या आजाराचा धोका वाढू शकतो. यामध्ये हाडांची झीज लवकर होते.

अति गोड पदार्थ

अति गोड पदार्थ खाल्ल्यामुळे हाडांमधील कॅल्शियम कमी होऊ शकते. साखर खाल्ल्यामुळे शरीराला आवश्यक असणारी पोषक तत्त्वे योग्य त्या प्रमाणात मिळत नाहीत. ज्या पदार्थांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त आहे, असे पदार्थ खाल्ले की, हाडातील कॅल्शियम कमी होऊन हाडे कमजोर होतात.

कॅफीन

कॅफिययुक्त पदार्थांचा समावेश आहारात केल्याने हाडे ठिसूळ होतात. विशेषत: महिलांमध्ये कॅफिनयुक्त पदार्थांचा परिणाम लवकर होतो. कॅफिनमुळे हाडे कमजोर होतात.

सोडा

अति जास्त प्रमाणात सोडा प्याल्यामुळे हाडांचे नुकसान होऊ शकते. यामुळे महिलांमध्ये हिप फ्रॅक्चरची समस्या वाढते. सोडा प्यायल्यामुळे रक्तातील कॅल्शियम शोषले जाते. यामुळे हाडांममधील बळकटी कमी होते.

अल्कोहोल

अल्कोहोलयुक्त पेय प्यायल्यामुळेही शरीरातील कॅल्शियम शोषले जाते. हाडे ठिसूळ होतात. त्यामुळे अल्कोहोलचे सेवन करणे टाळावे.