सेकंड हॅंड फोन विकत घेताय, सावध राहा; होऊ शकतो दंड आणि 3 वर्षांचा तुरुंगवास

सेकंड हँड फोन खरेदी करणे काही वेळे अतिशय त्रासदायक ठरू शकते. काही वेळा चोरीला गेलेले फोन विकत घेतले जातात. असे फोन विकत घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली, तर शिक्षा आणि दंड दोन्ही भरावे लागू शकते.

माहिती तंत्रज्ञान कायदा 2000च्या कलम 66 (b) अंतर्गत ही शिक्षा देण्यात आली आहे. ज्यानुसार शिक्षा आणि दंड दोन्हीची तरतूद करण्यात आली आहे. चोरीला गेलेला स्मार्ट फोन विकत घेतल्याची माहिती जर पोलिसांना मिळाली, तर 3 वर्षांपर्यंतची शिक्षा आणि 1 लाख रुपये दंड भरावा लागू शकतो.

सेकंड हँड फोन विकत घेताना सावध राहा
प्रीमियम किंवा कोणताही सेकंड हँड फोन खरेदी करत असाल, तर सर्वप्रथम तुम्ही स्मार्टफोन विकणाऱ्याला ओळखत असल्याची खात्री करा. याशिवाय फोनच्या मूळ बिलाची मागणी करा. ज्यावर जीएसटी क्रमांक असणे आवश्यक आहे. फोन विक्रेत्याच्या आधार किंवा ड्रायव्हिंग लायसन्सची फोटो कॉपीदेखील मागा. ज्यामुळे फोन विक्रेत्याच्या पत्त्याची संपूर्ण माहिती मिळेल.

पोलीस चोरी झालेला फोन कसा शोधतात
जेव्हा एखाद्या वापरकर्त्याचा फोन चोरीला जातो तेव्हा तो पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार करतो. त्यानंतर पोलीस आयएमईआय नंबरच्या मदतीने फोन ट्रॅकिंगवर ठेवतात. फोन ऑन होताच पोलिसांना फोनचे नेमके लोकेशन आणि त्यात वापरलेला नंबर कळतो.