पाचगणी

299
  • द्वारकानाथ संझगिरी

ऱ्याचदा आपण परदेशी भटकतो, पण आपल्या कुशीत खूप सुंदर जागा आहेत हे लक्षातच येत नाही. आयपीएल संपल्यावर मी विश्रांतीसाठी किशोर टेंबे या माझ्या मित्राच्या बंगल्यावर पाचगणीला गेलो होतो. त्याची जी प्रॉपर्टी आहे त्याला फक्त बंगल्यात राहणं म्हणणं म्हणजे ‘ताजमहल’ला नुसतं ‘कबर’ म्हणण्यासारखं आहे. त्याची प्रॉपर्टी पाहत आम्ही डोंगराच्या कड्यावर कधी पोहोचलो हे कळलंच नाही. त्याने तिथे एक गॅलरी तयार केलीय. खाली पाहिलं की, गॅलरीचा कठडा तुटला तर थेट स्वर्गाला तिथूनच पायऱया जातात हे जाणवतं. ती ‘खोली’ पाहिल्यावर त्या पायऱ्या नाहीत, स्वर्गात जायची लिफ्ट आहे असं वाटतं, पण समोर पाहिलं की, ‘‘अरे, आपल्याला दोनच डोळे का?’’ म्हणून आपण हिरमुसून जातो. एवढं मोठं दृश्य कसं दोन डोळ्यात साठवून ठेवायचं! समोर सिगारेटच्या पाकिटाएवढी दोन धरणं दिसतात. एक धोम धरण आणि दुसरं अपर धोम! कृष्णा नदी दिसते. ती लांबून पाहिल्याने वामकुक्षी घेतेय असं वाटतं. छोटी टुमदार खेडी, नजर जाते तिथपर्यंत पसरलेले डोंगर पाहताना ‘‘ये कौन चित्रकार है?’’ हा प्रश्न पडतोच. त्या चित्रकाराला आपण सलाम ठोकतो. हिंदू मंडळी त्या चित्रकाराला वेगवेगळ्या नावांनी ओळखतात. त्याच कड्यावर माझ्या मित्राने त्या चित्रकाराची आपणच तयार केलेलं चित्र सदैव डोळ्यांसमोर राहील अशी सोय केलीय. तो शंकराच्या पिंडीच्या आकाराचं पूर्णपणे दगडाचं देऊळ बांधतोय.

sydney-point

माझा मित्र तसा धार्मिक वगैरे नाही, पण अनेक देवळं पाहिल्यावर त्याला आपल्या जागेत डोंगराच्या कड्यावर दगडाचं देऊळ बांधावंसं वाटलं. दगड मागवून उत्कृष्ट कारागीरांकडून दगडाचे ड्रेसिंग करून ते देऊळ उभारलं जातंय. त्याने कोल्हापूरजवळच्या जोतिबाच्या डोंगरातून ३०० दगड आणले. त्यातला सर्वात मोठा दगड पाचशे किलोचा होता. त्यात शंकराची पिंडी असणार आहे. तिथे उभं राहिल्यावर किंवा खुर्ची टाकून बसल्यावर ‘झोंबतो गारवा’ म्हणजे काय हे मे महिन्यातही कळत होतं. मी मुंबईहून निघालो, तेव्हा अख्खी मुंबई घामाने निथळत होती. मुंबईत कपडे अंगात नाइलाजाने घालावे लागतात. तिथे रात्री झोपताना आम्ही पंखा बंद केला. दोनपैकी एक खिडकी बंद केली आणि एक छोटी मऊ ‘दुलईची मुलगी’ वाटावी अशी चादर अंगावर घेऊन झोपलो. मुंबईत मी घरात लेंगा, डिसेंबरात कधीतरी थंडीला चार दिवस विश्रांती घ्यायला यावंसं वाटतं तेव्हा घालतो. पाचगणीला मी अंगात लेंगा-झब्बा घालून झोपलो. पाचगणीचं नैसर्गिक एअरकंडिशनिंग भावलं. तेसुद्धा मे महिन्यात.

महाबळेश्वर हा पाचगणीचा थोरला भाऊ. तिथे प्रचंड गर्दी असते. त्यात पुन्हा महाबळेश्वरचं गुजरातीफिकेशन झालंय. साहजिकच आहे. कारण पैसे गुजरात्यांकडेच असतात आणि खर्च करायची त्यांना हौसही असते. पाचगणीचं तेवढे गुजरातीफिकेशन झालेलं नाही. मी पाचगणीला तीसेक वर्षांनी परत गेलो होतो, पण पाचगणीने फार मोठं बाळसं धरल्यासारखं वाटलं नाही. काही जुन्या ब्रिटिशकालीन इमारती. अजून डोळे सुखावतात. काही पारशांचे वाडे अबाधित आहेत. बोर्डिंग शाळा लहानपणीच्या आठवणी जागवतात. लहानपणी अभ्यास केला नाही, मस्ती केली की, वडिलांची एक स्टॅण्डर्ड दम देण्याची पद्धत होती. ‘‘याला पाचगणीच्याच बोर्डिंगमध्ये ठेवलं पाहिजे.’’ अत्यंत महागड्या बोर्डिंग स्कूलमधल्या मुलांचेही मला नेहमीच वाईट वाटत आलंय. मीसुद्धा घरापासून दूर हॉस्टेलमध्ये राहिलोय, पण वयात आल्यावर अनिर्बंध स्वातंत्र्य उपभोगत बाहेर राहणं वेगळं आणि लहानपणी आईवडिलांच्या मायेला पारखं होणं वेगळं! आईच्या कुशीत जेवढी शांत झोप लागते, तेवढी जगातल्या सर्वोत्कृष्ट झोपेच्या गोळीने किंवा हनीमूनला बायकोच्या मिठीतही लागत नाही. त्या शाळा पाहताना त्यांची श्रीमंती माझे डोळे दिपवू शकली नाही. दोन गरीब खोल्यांत का असेना, आईच्या उबदार कुशीत मी झोपू शकलो हीच मला मोठी श्रीमंती वाटली.

पाचगणीतून फिरताना सिल्व्हर ओक झाडांची सळसळ आणि कधी चंदेरी तर कधी हिरवा रंग मिरवणारी झाडं नजरेत बसतात. आणखी एक गोष्ट चांगली वाटते. कॉक्रीटचे उंच खोके नजरेला पडत नाहीत, ज्याला आपण शहरातील मंडळी टॉवर म्हणतो. मस्तपैकी प्रत्येक घराला उतरतं (sloping) छप्पर असते. तिथे पाऊस प्रचंड पडतो. त्यामुळे तो पाऊस काही काळ त्या छपरावर भरतनाटय़म करतो आणि त्याचे पाय थकले की, पाणी उतरत्या छपरावरून दरीत निघून जातं, पण पाचगणीत पावसाचा स्टॅमिना मोठा असतो. पावसाचे नाचरे पाय फार लवकर दमत नाहीत. माझा मित्र सांगत होता की, पावसाळ्यात ढग थेट दारेखिडक्यांमधून तुमची परवानगी न घेता घरात शिरतात. त्यामुळे ढगात राहायचा एक वेगळा अनुभव येतो. ढगाने केलेल्या गुदगुल्या अनुभवायला मला पावसात पुन्हा पाचगणीला जायचंय.

एक चांगली बातमी सांगतो, माझा मित्र डोंगराच्या कड्यावर एक रिसॉर्ट बांधतोय. म्हणजे गादीवर लोडाला टेकून बसल्या बसल्या समोर सेव्हंटी एमएम निसर्ग दिसणार. मी तसा अनुभव एकदा कोयनाला घेतला होता. कुणा मंत्र्याच्या बंगल्याचं हॉटेलमध्ये रूपांतर झालेलं होते. बंगला संपला की, पुढे पाच फुटांची हिरवळ आणि मग कोसळणारा कडा. गादीवर बसलं की, कोयना धरण, ते कोयनेचं पाणी दिसायचं. ‘‘ऐ मेरी जोहराजबी, तुझे मालूम नहीं, तू अभी तक हैं हसीं और मैं जवां’’ असं बायकोला आवर्जून सांगावं अशी ती जागा होती. पाचगणीलाही माझ्या मित्राचे हनीमून बंगले त्या डोंगराच्या कड्यावर उभे राहणार आहेत. मला जोडप्यांना फक्त एकच धोक्याचा इशारा द्यायचा आहे. ‘‘निसर्गात रममाण होऊन तिथे जाण्याचं महत्त्वाचं कार्य विसरू नका.’’

पाचगणीला गेल्यावर टेबललॅण्ड न पाहणं म्हणजे अभिषेक बच्चनला भेटल्यावर बरोबर असलेल्या ऐश्वर्याला ‘‘हॅलो’’ न म्हणणं. खरं तर अभिषेकशी बोलताना फक्त अभिषेकवर नजर ठेवणं कठीण जाऊ शकते. या टेबललॅण्डला मी दुसऱ्यांदा गेलो. मला तिथे दक्षिण आफ्रिकेतल्या केप टाऊनमधल्या टेबललॅण्डची आठवण झाली. मी आणि बायको तिथे वर चक्क स्वेटर विसरून गेलो होतो. वर थंड वारा इतका बोचकारत होता की, आम्हाला चक्क एकमेकांच्या बाहुपाशात फिरावं लागलं होतं. दक्षिण आफ्रिकेतल्या त्या टेबललॅण्डवरून केप टाऊनचा श्वास रोखून धरणारा नजारा दिसतो. कारण ते शहरच टेबललॅण्डला टेकून आणि महासागरात पाय सोडून बसलंय, पण पाचगणीचं टेबललॅण्ड जर प्रचंड मोठं डायनिंग टेबल असेल तर केप टाऊनचं टेबललॅण्ड एक छोटा टीपॉय आहे. पाचगणीच्या टेबललॅण्डवरून दिसणारा निसर्ग अफलातून आहे, पण आपल्याला तो केप टाऊनच्या टेबलप्रमाणे जगाला नीट विकता येत नाही हे आपलं दुर्दैव आहे! टेबललॅण्डवरून परतताना आम्ही मार्केटमधल्या ‘लकी’ रेस्टॉरंटमध्ये चहा आणि ब्रुन मस्का घेतला. तो जुना खानदानी इराणी आहे. ब्रुन पावावर मस्का इतका दिलदारपणे लावला होता की, ती चव अजून जिभेवर रेंगाळतेय.

मला ऐतिहासिक जागा आवडतात म्हणून आम्ही वाईजवळच्या मेणावली गावात गेलो. तिथे नाना फडणवीसांचं मोठं घर आहे. शी! काय शब्द वापरला मी? तो वाडा आहे. मला त्याला महाल म्हणता येत नाही म्हणून मी वाडा म्हणतोय, पण त्या वाड्याचं दुरुस्तीचे काम सुरू होतं म्हणून मला तो आतून पाहता आला नाही. त्या वाड्याबाहेर एक गोरख चिंचेचं झाड आहे. त्याचं खोड एवढं मोठं आहे की, दहा अमित शहा एकमेकांचे हात धरून झाडाभोवती उभे राहिले तरी दहाव्या अमित शहाचे हात पहिल्या अमित शहाला स्पर्श करणार नाहीत. त्यापेक्षा मोठं झाड मी नॉटिंगहॅमशायरमध्ये शेरवूडच्या जंगलात पाहिलं होते. त्या झाडात रॉबिनहूड लपायचा अशी आख्यायिका आहे. तिथला नदीचा घाटही अप्रतिम आहे. कधी तिथे गेलात तर तिथल्या देवळातली एक मोठी घंटा पाहायला विसरू नका. ती पंचधातूंची आहे. वसईत पोर्तुगीजांना हरवल्यावर चिमाजीअप्पाने ती तिथून आणली. निसर्ग जेवढा मला आनंद देतो तेवढ्याच या इतिहासाच्या पाऊलखुणा आनंद देतात. आपण जगभर त्या शोधत फिरतो, पण आपल्या घराजवळच्या पाहायला विसरतो. त्यामुळे पाचगणीची भटकेगिरी मला संस्मरणीय वाटली.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या