Lockdown treatment –अंडरआर्म काळे पडलेत ? मग त्वचा उजळवण्यासाठी हे उपाय करून पाहा

अंडर आर्म म्हणजेच काखेतील त्वचा काळवंडल्याने अनेकांना लाजिरवाणी परिस्थिती अनुभवायला लागते. फक्त महिलाच नाही तर पुरुषही अंडरआर्म काळे पडल्याची तक्रार करत असतात. अंडरआर्म काळवंडल्याने आवडते कपडे घालण्यावर निर्बंध येतात. स्टायलिश कपडे घालता येत नाही, बाहेर फिरताना वावरताना संकोचाने वागावे लागते, हात वर करता येत नाही.  या समस्येमुळे बहुसंख्य महिला आणि पुरुष त्रस्त आहे, मात्र याबाबत ते खुलेपणाने बोलत नाही. ही समस्या ओळखून काळवंडलेले अंडरआर्म पुन्हा उजळवण्यासाठी काही उपाय आज तुम्हाला सांगणार आहोत. हे अगदी सोपे आणि घरगुती उपाय असून यासाठी तुम्हाला अधिक कष्ट करण्याचीही आवश्यकता नाहीये.

हे वाचलंत का ? –  तोंड आलंय..? मग हे उपाय करून पाहा

अंडरआर्मची त्वचा उजळण्यासाठी जे साहित्य गरजेचं आहे ते तुम्हाला तुमच्या घरात अगदी सहजपणे सापडू शकेल. या अगदी सोप्या आणि घरगुती उपायामुळे तुमच्या काखेतील काळेपणा सहजपणे दूर होईल. मात्र हे उपाय करत असताना एका गोष्टीची काळजी नक्की घ्यायला हवी. काखेतील त्वचा ही संवेदनशील असते,  त्यामुळे हे उपाय करत असताना त्वचेचे नुकसान होणार नाही याची काळज आवश्यक आहे. काय आहेत हे उपाय आपण पाहूयात. मात्र त्याआधी पाहूयात की अंडरआर्म काळवंडतात का ? त्याची कारण

ही आहेत काखेतील त्वचा काळवंडण्यामागची कारणे

काखेतील केस काढण्यासाठी जी क्रीम वापरली जातात, ज्याला आपण हेअर रिमूव्हल क्रीम म्हणतो त्याचा  अति वापर केला तर ही त्वचा काळवंडू शकते.

अनेकदा महिला पुरुषांच्या दाढीसाठीचं रेझर काखेतील केस काढायला वापरतात. त्याच्यामुळेही ही त्वचा काळवंडू शकते. महिलांसाठीची वेगळी रेझर बाजारात उपलब्ध आहेत, मात्र त्याच्या अति वापरानेही ही त्वचा काळवंडते. त्यामुळे तज्ज्ञ रेझरऐवजी व्हॅक्सिंगचा पर्याय स्वीकारावा असे सुचवतात. यामुळे केस मुळापासून काढले जातात आणि त्वचेवरील मृत पेशी दूर करण्यासही मदत होते.

हे वाचलंत का ? – मोज्याला दुर्गंधी येतेय? मग हे घरगुती उपाय करून पाहाच…

काखेतील त्वचा काळवंडण्यामागे तंग कपडे परिधान करणे, जास्त घाम येणे,  हार्मोन्सचे संतुलन बिघडणे, डिओडरंटचा अतिवापर ही देखील कारणे आहेत. काही सुगंधी द्रव्ये किंवा डिओडरंटमध्ये केमिकलचा वापर करण्यात आलेला असतो. याचा तुमच्या त्वचेवर परिणाम होत असतो. यामुळे डिओडरंट त्वचेवर मारण्याऐवजी कपड्यांवर मारावे आणि ते मारत असताना थोडं अंतर ठेवून मारावे जेणेकरून स्प्रे ठराविक जागेऐवजी मोठ्या भागावर फवारला जातो.

सर्वोत्तम उपाय- हळद

turmeric

हिंदुस्तानातील प्रत्येक घरात सहजपणे आढळणारी हळद हे अत्यंत गुणकारी औषध आहे. हे औषद असे आहे की जे पोटातही घेऊ शकतो आणि त्वचेवरही लावू शकतो. हळद आपण त्वचा उजळवण्यासाठी वापरतो. हळदीमध्ये कोमट दूध किंवा गुलाबपाणी मिसळून त्याचा तोंडाला लावण्यासाठीचा पॅक तयार करता येतो. वर नमूद केल्याप्रमाणे काखेतील त्वचा ही अत्यंत संवेदनशील असल्याने तिथे लावण्यासाठी हळद ही गुणकारी ठरू शकते.

हे वाचलंत का ? – मीठ आणेल आयुष्यात गोडवा, मिठाचे हे फायदे वाचून तुम्हीही आश्चर्यचकीत व्हाल

अनेकदा हळदीमध्ये भेसळ केलेली असते, त्यामुळे त्वचेवर लावण्यापूर्वी हळद ही शुद्ध आहे का भेसळयुक्त हे तपासून घ्या. हळकुंड विकत घेऊन त्याची वस्त्रगाळ हळद केलेली कधीही चांगली असते. हळदीमध्ये दूध घातल्यास त्याचा चांगला परिणाम होतो. दुधामध्ये लॅक्टिक अ‍ॅसिड असते आणि त्याच्यामुळे त्वचेचा काळेपणा दूर होण्यास मदत होते.

ही हळद कशी लावायची ते देखील आपण पाहूयात  

एक चमचा हळद, एक चमचा दूध आणि मध एकत्र करावा. मध नको असल्यास हळद आणि दूध घेतलं तरीही चालेल. मधामुळे दूध आणि हळदीची पेस्ट चिकट होण्यास मदत मिळते. शिवाय मधाचे औषधी गुणही या लेपाला अधिक गुणकारी बनवतात. किमान 20 मिनिटांसाठी ही पेस्ट काखेतील त्वचेवर लावून ठेवावी. सुकल्यानंतर हा लेप पाण्याने धुवून टाका, हा उपाय आठवड्यातून दोन वेळा तरी करून पाहा.

चमत्कारी कोरफड

aloe-vera

हळदीप्रमाणे कोरफड ही देखील अत्यंत गुणकारी आहे. मात्र हळदीप्रमाणे ती घरात सहजपणे उपलब्ध होईल असे नाही. हल्ली बाजारामध्ये कोरफडीचा रस उपलब्ध असतो. कोरफडीची पाने मिळाली नाही तर त्याचा वापर करता येईल, मात्र तो शुद्ध आहे याची खात्री करून घ्या. कोरफडीमध्ये एलोसिन (Aloesin) नावाचा घटक असतो. हा घटक त्वचा काळी पाडण्याऱ्या आहे. पिगमेंटेशनला रोखण्यास मदत करतो. कोरफडीमध्ये विषाणूविरोधी गुणधर्म असल्याने त्याचा वापर अनेकदा जखमा भरून काढण्यासाठीच्या औषधांमध्येही केला जातो. कोरफडीमुळे त्वचेला सुटणारी खाज ,जळजळ कमी होते. यामुळे कोरफड ही सौंदर्यप्रसाधनांमध्येही वापरली जाते. हल्ली काही कंपन्या पुरुषांच्या सौंदर्यप्रसाधनांमध्ये कोरफडीचाही वापर करतात.

कोरफडीचा वापर कसा करायचा ते पाहूयात

कोरफडीचा गर काढून त्याची पातळ पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट काखेतील त्वचेवर लावून ठेवावी. किमान 15 मिनिटांसाठी ही पेस्ट लावून ठेवा. नंतर काखेतील त्वचा साध्या पाण्याने स्वच्छ धुवा.

बदामाचे तेल असल्यास हा उपाय करून पाहा

almond02

पहिल्या दोन उपायांपेक्षा हा उपाय थोडा खर्चिक वाटू शकतो. बदामाचं तेल हे घरीत उपलब्ध नसतं, ते बाजारातून विकतच घ्यावं लागेल. मात्र बदामाच्या तेलामध्ये फायटोकेमिकल असते जे काखेतील काळेपणा दूर करण्यास मदत करते. शिवाय या तेलामध्ये असलेल्या ‘व्हिटॅमिन ई’ मुळे  त्वचा मुलायम होते.

बदामाचे तेल वापरून काळवंडलेली त्वचा पुन्हा कशी उजळवायची ते पाहूयात

बदामाच्या तेलाचे 5-6 थेंब तळहातावर घ्या आणि त्याने काखेतील त्वचेला हलक्या हाताने मसाज करा. हा मसाज सर्क्युलर पद्धतीने म्हणजेच गोलाकार पद्धतीने करावा.

हे तेल त्वचेमध्येपटकन मुरतं. मसाज झाल्यानंतर दहा मिनिटे थांबा आणि नंतर त्वचा साध्या पाण्यानं स्वच्छ धुवा. हा उपाय आठवड्यातून दोन वेळा केल्यास त्याचा चांगला फायदा होतो.

खाण्यासोबतच त्वचेसाठी काकडी ही हवीच

cucumber

काकडी ही भाजीवाल्याकडे सहज मिळते, घरातही ती उपलब्ध असतेच. काकडी ही थंड असल्याने तिच्या चकत्या डोळ्यावर ठेवल्यास डोळ्यांची जळजळ थांबवण्यास, डोळ्याखालील काळी वर्तुळे घालवण्यास मदत होते. काकडी ही रंग उजळवण्यासाठी गुणकारी आहे. त्यामुळे काकडीतील तत्वांचा वापर सौंदर्यप्रसाधनांमध्ये केला जातो.

काकडीचा वापर काखेतील काळवंडलेली त्वचा उजळवण्यासाठी कसा कराल, ते वाचा

मिक्सरमध्ये काकडीचा लगदा करून घ्या.  काकडीची तयार झालेली पेस्ट काखेतील त्वचेवर लावून काही मिनिटांसाठी हलक्या हातानं मसाज करा. मसाज झाल्यानंतर 10 मिनिटे थांबा आणि नंतर त्वचा साध्या पाण्यानं स्वच्छ धुऊन घ्या. हा उपाय तुम्हाला नियमितपद्धतीनेही करता येईल. काखेत काकडी लावल्यानंतर 10 मिनिटे वाट पाहात असताना उरलेली काकडी तुम्ही डोळ्यावर ठेवून डोळे बंद करून शांत पडून राहू शकता. यामुळे तुमच्या डोळ्यांचे स्वास्थ्य सुधारण्यासही मदत होईल.

मॅजिकल मुलतानी माती

multani-mati

मुलतानी मातीचा वापर आपण फेस पॅकसाठी तसेच हेअर पॅकसाठीही करतो. त्वचेची छिद्रे स्वच्छ करून त्यातील दुर्गंध निर्माण करणारे विषाणू नाहीसे करण्याचे काम मुलतानी माती करते. यामुळे मृत पेशींची समस्या देखील कमी होते आणि त्वचा नैसर्गिकरित्या एक्सफोलिएट होऊन अंडरआर्मचा काळेपणा दूर होण्यास मदत होते.

या मातीचा वापर कसा करायचा ते पाहूयात

दोन चमचे मुलतानी माती आणि गुलाब पाणी घ्या. त्याची पेस्ट तयार करून १० मिनिटांसाठी अंडरआर्मच्या त्वचेवर लावा. मातीचा थर सुकला की तो पाण्याने स्वच्छ धुवून टाका. आठवड्यातून तीन वेळा हा उपाय केल्यास त्याचा फरक दिसायला सुरुवात होते.

आपली प्रतिक्रिया द्या