सिंधुदुर्गात येवा!पॉटभर खावा!

स्वप्नील साळसकर

आज अनेक पर्यटक कोकणात फिरायला येतात… त्या सर्वांची रसवंती पूर्ण करण्याची जबाबदारी येथील स्थानिकांनीच उचलली आहे. आज तळकोकणातील प्रत्येक घरातून पर्यटकांना त्यांच्या आवडीचे अस्सल कोकणी पदार्थ अगदी ताजे आणि माफक दरात पुरविले जातात..

कोकण…निसर्गसौंदर्याने पुरेपूर…समृद्ध…पण ही समृद्धी केवळ पाहण्यापुरतीच मर्यादित नाही, तर कोकणची खाद्यसंस्कृतीही तितकीच वैविध्यपूर्ण… समृद्ध… केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर अनेक अमराठी पर्यटकही कोकण फिरायला… खास कोकणी पदार्थ चाखायला कोकणात येतात. आज कोकणात अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट्स उभी राहिली आहेत. उत्तम प्रतीची निवासस्थाने आहेत. पण तेथे अस्सल कोकणी पदार्थ मिळतातच असे नाही. किंबहुना खरे तर मिळतच नाहीत.

konkan-road

‘येवा, कोकण आपलोच आसा!’ या सिंधुदुर्गवासीयांच्या हाकेने सर्वांनाच भुरळ घातली. निसर्गदेवतेने भरभरून दिलेले विपुल सृष्टीसौंदर्य नेहमीच पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय ठरले. प्रत्येक तालुक्यातील मिठास अशी बोलीभाषा, खाण्याजेवणाची पद्धत फार वेगळी आहे. येथील पर्यटन हे एक रोजगाराचे साधन बनले असून जिल्हय़ात दाखल होणाऱया पर्यटकांना स्थानिक खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी आता घरोघरी खानावळी, भोजनालये उभी राहिली आहेत. सध्या सुट्टीचा मोसम असल्याने पर्यटनालाही जोर चढला आहे. विविध स्थळांना भेटी देताना खाण्यापिण्याची हौस तर यांच्याकडून पूर्ण होऊ लागली आहे.

सिंधुदुर्ग किंवा संपूर्ण कोकणातच स्थानिक लोक आपापल्या धंदा व्यवसायात मग्न होते. पण कोकणात येणाऱया पर्यटकांना त्याच ठिकाणचे खास जेवण हवे असते. खास त्या मातीतला स्पेशल मेन्यू शोधत हे पर्यटक सिंधुदुर्गात येतात तेव्हा मोठमोठय़ा हॉटेलांमध्ये जाण्यापेक्षा त्यांना स्थानिकांकडे तो खास मेन्यू मिळू लागला. म्हणून मग या स्थानिकांनी आपापले व्यवसाय सांभाळून पर्यटनाचा हंगाम आला की पर्यटकांसाठी स्थानिक पद्धतीचे जेवण उपलब्ध करून देण्याचा धंदाच सुरू केला. इतर वेळी त्यांचा व्यवसाय सुरूच राहातो. ‘पॉटभर खावा नि मस्त ऱहवा’ असं सांगत सिंधुदुर्गवासी याच उद्देशाने आता या पर्यटन उद्योगात उतरू लागला. एक वेळ अशी होती वर्षातून एकदाच शेती, मासेमारी करायची किंवा इतर कामधंदे करून आपली उपजीविका करायची, कुटुंबातील काही सदस्य नोकरीधंद्यानिमित्त शहरात असायचे. त्यामुळे पैशाचे पाठबळ असायचे. मात्र आता सुशिक्षित तरुणांनी आपापल्या गावातच उद्योग-व्यवसाय करण्यावर लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. आपली चटकदार खाद्यसंस्कृतीतूनच पैसा कमवायचे त्यांनी ठरवले आहे.

pithal-bhakri-1

वैभववाडीची ‘पिठलं-भाकरी’

वैभववाडीतील वाभवे गावात वैजयंती कदम यांनी आपला शेतीव्यवसाय सांभाळून हा खानावळीचा जोडव्यवसाय सुरू केला. वैभववाडीत नापणे, सैतवडा धबधबा प्रसिद्ध आहे. त्यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा या भागांतून पर्यटकांचा या ठिकाणी ओढा असतो. कदम यांनी तयार केलेली नाचणीची भाकरी आणि डांगर, पिठी-भाताची चव जिभेवर रेंगाळतच राहाते. याशिवायही सातकाप्याचे घावणे, आंबोळी चटणी, मांसाहारीमध्ये वडे-मटण यांसारखे इतरही मेनू तेवढेच उत्कृष्ट बनवतात.

सारंग यांचे ‘खेकडय़ाचे सार’

वेंगुर्ले तालुक्यातील कोरजाई गावात अजय सारंग यांनी पर्यटकांसाठी खास घरगुती जेवणाची सोय केली आहे. त्यांनी तयार केलेले खेकडय़ाचे सार हा मेनू सध्या खूपच प्रसिद्ध झाला आहे. शाकाहारी तशीच मांसाहारी जेवणाची हौस या ठिकाणी पूर्ण होते. साधारण १५० ते १८० या माफक दरात भरपेट जेवण देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातो. पर्यटकांसाठी नदीतील होडी सफरही ते घडवतात. सातजणांच्या ग्रुपला होडीतून काही ठराविक दर आकारून मालवणच्या देवबाग संगमापर्यंत ते फेरफटका मारून आणतात.

modak-kadai

बागायतकरांचे ‘उकडीचे मोदक’

वेंगुर्ले रेडीमधील बोंबडोजीची वाडीमधील बागायतकर यांची दत्तनिवारा खानावळ सध्या सात्त्विक जेवणासाठी प्रसिद्ध आहे. येथील द्विभुज गणपती मंदिरात येणाऱया भाविकांसाठी संकष्टीनिमित्त उकडीचे मोदक, तांदळाची भाकरी, वरणभात, ताक, सोलकढी असे शुद्ध शाकाहारी जेवण ८० रुपयांत दिले जाते. पर्यटकांनी मागणी केलेली चून (खोबऱयाची) कापे येथील प्रसिद्ध मेवा आहे.

सावंतवाडीचा ‘चिकन-पाव’

कोकणातील प्रत्येक घर आपापल्या परंपरेनुसार एकेका खाद्यपदार्थामध्ये तरबेज असते. नगर परिषदेच्या कार्यालयासमोर एका गाळय़ात पेडणेकर यांनी घरगुती पद्धतीचे तयार केलेले चिकन पर्यटकांच्या आवडीचा विषय बनले आहे. आपली शेतीवाडी सांभाळून खास पर्यटकांसाठी त्यांनी हा मेनू तयार केला आहे. घरात चिकन तयार करायचे असेल तर अगोदर काही दिवस बेत आखला जातो. मात्र सावंतवाडीत सकाळी ७ वाजल्यापासून चिकन-पाव ही अलीकडे फेमस झालेली डिश उपलब्ध आहे.

surmai

मालवणची ‘सुरमई’

मालवण तालुक्यातील चिवला बीचवरील असलेले बंडू कांबळी यांच्या ‘किल्ला रिसॉर्ट’ने पर्यटकांच्या पोटापाण्याची चांगलीच व्यवस्था केली आहे. ‘मागाल ते मिळेल’ अशी येथील पद्धत आहे. सकाळी घावने, चटणी-आंबोळी, शेवया आणि रस नाश्त्यासाठी मिळतोय. दुपारच्या जेवणाला बांगडा, सुरमई, पापलेट फ्राय अशा आपल्या पसंतीच्या डिशही उपलब्ध आहेत. बाहेरील हॉटेलपेक्षा येथील दर सर्वसामान्यांच्या आवाक्यातील आहेत. कांबळी यांची नम्र आणि विनयशील वागणूक पर्यटकांना त्यांच्याकडे ओढून घेण्यात यशस्वी ठरलीय. त्यामुळे लोकही दूरदूरवरून येतात ते बंडू कांबळी यांचं नाव घेऊनच… बऱयाचदा काही हॉटेल्सही त्यांच्याकडून खास मालवणी पद्धतीचे जेवण मागून घेतात.

खाडी सफर आणि मच्छीचा आस्वाद

वेंगुर्ले दाभोसवाडा येथील स्वामिनी महिला बचत गटाने मॅनग्रोव्हस् इको टूरिझम तयार केले आहे. या ठिकाणी होडय़ांमधून पर्यटकांना खाडीची सफर घडवली जाते. शिवाय कांदळवनाची माहिती, खाडीत असलेले लहान मासे, पाणमांजर यांचीही ओळख करून दिली जाते. याशिवाय त्यांच्या आवडीचे खाडीतील मासे सौंदाळे, हलवा, कोळंबी, तिसरे असलेले मांसाहारी जेवण १५० तर शाकाहारी साधारण १०० रुपये थाळी उपलब्ध करून दिली आहे.