
प्रखर सूर्याच्या ‘डोळय़ाला’ डोळा भिडवण्याचं धाडस कोणी करू शकत नाही आणि करूही नये. कारण सूर्यकिरणांमध्ये असलेल्या अतिनील किरणांचा आणि उष्णतेचा विपरीत परिणाम होऊन डोळय़ांना कायमची इजा होऊ शकते. मग ‘जीवनदायी’ अशा सूर्याचं ‘दर्शन’ कसं घ्यायचं? ही गोष्ट सूर्याला ग्रहण लागतं त्यावेळी शक्य असते. पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये चंद्र किती प्रमाणात येतो यावर सूर्याला खंडग्रास ग्रहण लागणार की खग्रास हे ठरतं. सूर्याचं विलोभनीय रूप बघण्याची पर्वणी म्हणजे खग्रास सूर्यग्रहण. मात्र त्याकडे वैज्ञानिक दृष्टीने पाहायला हवं.
१६ फेब्रुवारी १९८० रोजी दुपारी पावणेतीन वाजता कर्नाटकातल्या रायचूर येथून आम्ही सुमारे पावणेतीन मिनिटांचं खग्रास सूर्यग्रहण अनुभवलं आणि पत्रकार म्हणून ‘श्री’ साप्ताहिकासाठी त्याचं रिपोर्टिंग केल्याचं आठवतं. हे ग्रहण हिंदुस्थानात १८९८ नंतर म्हणजे तब्बल ८२ वर्षांनी दिसलं होतं. त्यामुळे त्याविषयीचे अनुभव सांगू शकणारी मंडळी असली तर फारच थोडी होती. आम्ही रायचूरला पोहोचल्यावर तिथे मात्र जगभरचे वैज्ञानिक तसंच सर्वसामान्य उत्सुक लोक मोठय़ा संख्येने जमले होते. देशातील अधिकाधिक मंडळी होती ती आपली मराठी माणसं. आम्ही सर्वांनी मिळून ते विलक्षण क्षण अनुभवले.
सूर्यग्रहण नेहमीच अमावस्येला आणि चंद्रग्रहण पौर्णिमेला होते. एखाद्या अमावस्येला चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या बरोबर मधोमध येतो आणि सूर्यबिंब पूर्णपणे झाकून टाकतो. चंद्राची दाट सावली पृथ्वीवर ज्या भागात म्हणजे सुमारे ७० ते १०० किलोमीटरच्या पट्टय़ात पडते तिथूनच खग्रास सूर्यग्रहण दिसतं. त्याच्या आजूबाजूच्या काही भागांतून खंडग्रास सूर्य दिसतो. मात्र केवळ खग्रास सूर्यग्रहणातच खग्रास – पट्टय़ावर (टोटॅलिटी पाथ) गेलं तर चंद्रबिंबाने पूर्णपणे झाकलेला सूर्य आणि काही क्षणांची ‘रात्र’ अनुभवायला मिळते. पक्षी घरटय़ाकडे परतण्याचा ‘चकवा’ अनुभवतात आणि सूर्याचं कधीही न दिसणारं प्रभामंडळ दिसून येतं. चंद्रावर डोंगरदऱ्या असल्याने तेवढय़ा भागातून दिसणारा सूर्यप्रकाश लाल मण्यांच्या आकारासारखा दिसतो. बेली या वैज्ञानिकाने याचा शोध लावला म्हणून त्याला बेलीचे मणी (बेलीज् बीड्स) म्हणतात. याचवेळी सूर्यपृष्ठावरून उसळणाऱ्या काही हजार किलोमीटर लांबीच्या सौरज्वाळा आपण पाहू शकतो. हेच सूर्याचे सौंदर्य! हिंदुस्थानातून १९८०, ९५, ९९ आणि २००९ अशी चार खग्रास सूर्यग्रहणं वीस आणि एकविसाव्या शतकात अनुभवायला मिळाली. त्यानिमित्ताने ‘खगोल मंडळा’सारख्या संस्थांनी वैज्ञानिक जनजागृतीही केली. शेकडो लोकांनी उत्तर प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रात नंदुरबारजवळच्या भागात जाऊन ही खग्रास सूर्यग्रहणं डोळय़ाला संरक्षक गॉगल लावून पाहिली.
सूर्यग्रहण पाहू नये अशी आपल्याकडे जी पारंपरिक कल्पना होती ती सूर्याच्या प्रखरतेनं डोळय़ांना इजा होऊ नये यासाठीच असावी. आता मात्र आधुनिक विज्ञानाने सूर्याकडे पाहण्यासाठी खास ‘मायलर फिल्म’चे चष्मे आणले आहेत. अशा चष्म्यांमध्येही सूक्ष्म छिद्र असता कामा नये याची मात्र खात्री करून घ्यायला हवी. डोळय़ांची योग्य काळजी घेऊन सूर्यग्रहण पाहायला काहीच हरकत नाही. बाकीचे अंधविश्वास आता ज्ञानाच्या सूर्यतेजानेच लयाला जात आहेत. मनात धास्ती बाळगून मात्र ते पाहू नये. वैज्ञानिक माहिती नीटपणे जाणून, पटवून घेऊनच सूर्य-सौंदर्य अनुभवावे.
या सर्व गोष्टींचा उैहापोह आता करण्याचे कारण म्हणजे अमेरिकेत (यूएस) ९९ वर्षांनी सबंध देशभर दिसलेले खग्रास सूर्यग्रहण. हजारो अमेरिकनांनी पूर्वी कधी न घेतलेला सौर-सौंदर्याचा अनुभव घेतला. हजारो फोटो आणि व्हिडीओ काढले. महाराष्ट्रातून आपले अनेक मराठी अभ्यासक तिकडे गेले किंवा तिथे नोकरीनिमित्त आधीच जे होते त्यांनी हे ग्रहण अनुभवून त्याचे सुंदर फोटोही त्वरित पाठवले. आपली पृथ्वी, सूर्य, विश्व हे अधिकाधिक जाणून घेण्याचे प्रयत्न जगभर सुरू आहेत. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांनी दिलेली ‘जय विज्ञान’ ही घोषणा प्रत्यक्षात आणण्यातच पुढच्या पिढीचं भवितव्य आहे. मात्र विज्ञानाचा वापर मानवी आणि जीवसृष्टीच्या कल्याणासाठी व्हायला हवा.