#MeToo माजी राष्ट्रपतींवर लैंगिक शोषणाच्या आरोपांनी जगभरात खळबळ

42

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

संपूर्ण जगभरात सुरू असलेल्या #MeToo चळवळीमुळे अनेक मोठे मासे समोर येत आहेत. आता कोस्टारिकाचे 78 वर्षीय माजी राष्ट्रपती ऑस्कर एरियसही #MeToo च्या कचाट्यात आले असून माजी सौंदर्यवती याजमिन मोराल्स हिने त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. ऑस्कर एरियस यांनी दोन वेळा राष्ट्रपतीपद भूषवले आहे.

याजमिन मोराल्स हिने कोस्टारिकाचे माजी राष्ट्रपती ऑस्कर एरियस यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहे. या प्रकरणी याजमिन हिने तक्रारही दाखल केली आहे. 2015 मध्ये एरियस यांच्या सॅन जोस येथील घरात हा प्रकार घडल्याचे याजमिन हिने आपल्या तक्रारीमध्ये नमूद केले आहे. याजमिन हिच्यासह आतापर्यंत पाच महिलांनी एरियस यांच्याविरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत.

एरियस यांनी मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप याजमिन हिने केला आहे. व्यक्तीगतरित्या ओळखणाऱ्या माणसाकडून हा प्रकार झाल्याने मला प्रचंड धक्का बसला होता. विरोध केला असता ते मला सोशल मीडियावर फॉलो करू लागल्याचेही याजमिन हिने सांगितले. दरम्यान, एरियस यांच्यावर अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्याच्या वृत्ताला कोस्टारिका पोलिसांनी दुजोरा दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या