चाट आणि पानपट्टीचा व्यवसाय करून झाले करोडपती, आयकर आणि जीएसटी धाडीत 256 विक्रेते निघाले कोटय़धीश

कानपूरमध्ये रस्त्याच्या कडेला पान, चाट आणि समोसाची गाडी लावणारे विक्रेते कोटींमध्ये खेळत आहेत हे ऐकून आपणही थक्क व्हाल. मात्र यावर विश्वास ठेवावा लागेल. गल्लीबोळात छोटे-छोटे दुकानांचे मालक, किराणा मालाचे दुकानदार, औषध विक्रेते करोडपती आहेत, परंतु हे ना आयकर भरतात-ना जीएसटीच्या नावावर एक पैसा देतात. बिग डेटा सॉफ्टवेअर, आयकर विभाग आणि जीएसटी नोंदणीच्या तपासणीत रोडच्या कडेला गाडी लावून व्यवसाय करणारे 256 जण करोडपती निघाले आहेत.

एकटय़ा कानपूरमध्ये जीएसटी नोंदणीत बाहेरील या व्यापाऱयांनी एक पैसाही कर भरला नाही, परंतु चार वर्षांत 375 कोटींची मालमत्ता विकत घेतली. ही मालमत्ता आर्यनगर, स्वरूपनगर, बिरहाना रोड, हुलागंज, पिरोद, गुमटी यांसारख्या अत्यंत महागडय़ा व्यावसायिक भागात खरेदी केली गेली. तसेच दक्षिण कानपूरमध्ये निवासी जमीन खरेदी केली. तसेच 30 कोटींपेक्षा जास्त किमतीची केव्हीपी खरेदी केली. ते 650 बिघा शेतजमिनीचे मालकदेखील बनले. कानपूर देहात, कानपूर नगर, बिठूर, नरमाऊ, मंधाना, बिल्हौर, काकवण, सरसौल ते फारुखाबाद या ग्रामीण भागात त्यांना जमिनी खरेदी केल्या आहेत.

सहकारी बँकांत खाती; गुंतवणूक भाऊ, बहीण, काकाच्या नावे

पानपट्टी आणि चाटपुरीचे  ठेले चालवणाऱया अनेक विव्रेत्यांनी आपली खाती राष्ट्रीयीकृत बँकांत न उघडता सहकारी बँकांत उघडली आहेत. जेणेकरून आयकर आणि जीएसटी करापासून त्यांची सुटका व्हावी. पण आयकर विभागाने आता या छोटय़ा विव्रेत्यांचा फंडा अवगत करीत त्यांना नोटिसा पाठवल्या आहेत. या मालमत्तेत बहुतांश गुंतवणूक भाऊ, मेहुणी, काका, मामा आणि बहीण यांच्या नावावर केली गेली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या