अवाजवी वीज बिलाने ग्राहक हैराण

39

सामना ऑनलाईन, साक्री

साक्री तालुक्यातील जवळपास सर्वच परिसरातील विद्युत वितरणच्या कार्यालयामार्फत वीज ग्राहकांकडे आकारली जाणारी वीजबिले ही अवाचेसवा प्रमाणात आकारली गेल्यामुळे ग्राहकांना निष्कारण भुर्दंड सोसावा लागत आहे. याबाबतीत अशिक्षित ग्राहकांना नाईलाजाने बिलाचा भरणा करावा लागत आहे. वीज वितरण कंपनीचे कर्मचारी बिल आकारणीत आमचा संबंध नसल्याचे सांगून हात झटकत आहेत. त्यामुळे व्यथा कुणाकडे मांडावी या विवंचनेत ग्राहक दिसत आहेत.

विद्युत वितरण कंपनीमार्फत विद्युत वापराच्या रीडिंगसाठी खासगी ठेकेदारास कॉण्ट्रक्ट दिले असल्याचे सांगितले जात असून सदर ठेकेदाराचा माणूस प्रत्यक्ष मीटर रीडिंगसाठी जात नाही. तसेच प्रत्यक्ष मीटरची रीडिंगपेक्षा कमी-जास्त रीडिंग दाखवतो. वास्तविक ग्रामीण भागातील ग्राहक आर्थिकदृष्ट्या काटकसरीने वागत असताना अवाजवी स्वरूपात वीजबिल आकारले गेल्याने तो हैराण होत असतो. त्याबरोबर प्रसंगी वीजबिल भरणा न झाल्याने विद्युत कनेक्शन तोडले जाते. चुकी नसताना अन्याय सहन करावा लागण्याची वेळ आल्यामुळे प्रसंगी आंदोलने केली जातात. त्यामुळे उगीच विद्युत ग्राहकांचा अंत व संयम न पाहता विद्युत वितरणने वेळीच खबरदारी घ्यावी. अन्यथा येथे ग्राहक मोठे आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या