शिवसेनेवर टीका करताना मुख्यमंत्र्यांचा आवाज बसला

मुंबई – मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांचे अर्ज दाखल होण्याच्या आधी आणि प्रचाराची रणधुमाळी सुरू होण्याच्या आधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘आवाज’ शिवसेनेवर तोंडसुख घेताना बसला. गोरेगाव येथील स्पोर्टस् कॉम्प्लेक्समध्ये भाजपने घेतलेला ‘विजय संकल्प मेळावा’ म्हणजे पक्षाची सलामीची सभा मानली गेली होती. पण शिवसेनेवर टीका करताना पहिल्याच सभेत खुद्द मुख्यमंत्र्यांचीच दमछाक झाल्याने भाजप पुढची लढाई कशी लढणार, अशी चर्चा त्या सभेनंतर रंगली.

विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेना १४७, भाजप १२७ आणि मित्रपक्ष १८ जागा लढणार असे ठरले होते. पण तेव्हा शिवसेना १५१ जागांवर अडून बसल्यामुळे युती तुटली असा आरोप फडणवीस यांनी केला. विधानसभा निवडणुकीत युती तुटली ते एकाअर्थाने बरेच झाले. युती तुटली नसती तर मी मुख्यमंत्री कधीच झालो नसतो, असे ते म्हणाले.

महापालिका निवडणुकीसाठी आम्ही पारदर्शीपणा ही एकच अट ठेवली होती. पारदर्शीपणासाठी आग्रह धरला तर ती माझी चूक आहे काय, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी यावेळी विचारला. आमचा आणि शिवसेनेचा विचार एकच आहे. पण आचार पटला नाही, असे त्यांनी सांगितले.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी आमची विचारांची लढाई आहे, असे सांगतानाच निवडणुका आल्या की भाषावाद, प्रांतवाद, जातीवाद, धर्मवाद सुरू होतात, असा आरोप फडणवीस यांनी या सभेत केला. मुंबईच्या विकासात मराठी आणि बाहेरून आलेल्या लोकांनीही योगदान दिलेले आहे. भाजपला मराठी अमराठी भेद करायचा नाही, असे ते म्हणाले.

निरुत्साह आणि कंटाळलेले चेहरे

भाजपची पहिलीच प्रचारसभा असतानाही संपूर्ण सभेत निरुत्साह जाणवणाराच होता. टाळय़ा वाजत होत्या पण त्यात जोर नव्हता. त्यात मुख्यमंत्र्यांच्या लांबलेल्या भाषणाने गर्दी कंटाळल्याचे प्रकर्षाने जाणवत होते. गर्दीच नव्हे तर व्यासपीठावरील विनोद तावडे, प्रकाश मेहता, विद्या ठाकूर यांच्या चेहऱ्यावरही तो निरुत्साह जाणवत होता.

आपली प्रतिक्रिया द्या