कोरोना योध्याला सलाम! एका रात्रीतून 375 कॉन्टॅक्ट ट्रेस केले, अन्यथा…

3852

बीड जिल्हा कोरोना पासून मुक्त होता तो आरोग्य विभागाच्या परिश्रमामुळेच. त्यांच्या जबाबदारीची आणि मेहनतीची चुणूक पुन्हा एकदा दिसून आली. ज्या रुग्णामुळे संपूर्ण बीड शहरासह ग्रामीण भाग भयभीत झाला त्याच्या आणि इतरांच्या संपर्कात आलेल्या तब्बल 375 जणांना रात्रीतून ट्रेस करण्यात आले. तसेच एवढ्या लोकांना होम क्वारंटईन केले आणि त्यांच्या घरावर स्टिकर चिटकवून महाकावच ऍप वरून त्यांच्यावर करडी नजर ठेवली जात आहे. घाई केली नसती तर पुढच्या आठवड्यात बीड जिल्ह्यातील चित्र भीतीदायक झाले असते. रात्रभर जागून शहरातील 275 अन ग्रामीण भागातील 100 जणांना ट्रेस करण्याची किमया साधली ती जिल्हाआरोग्य अधिकारी डॉ. राधाकिसन पवार आणि त्यांच्या 50 जणांच्या टीमने.

एक रुग्ण रुग्णालयात छाती दुखत असल्याचे सांगत दाखल होतो. त्याच्यावर दोन दिवस त्या रुग्णालयात उपचार होतात. अजून दोन रुग्णालयात जाऊन तो तपासणी करून येतो. अन नंतर स्पष्ट होते की त्या रुग्णाला कोरोनाची लागण झाली आहे. आता खरे संकट प्रशासनाच्या डोळ्यासमोर दिसू लागते. हा रुग्ण ज्या तीन रुग्णालयात जाऊन आला तेथे किती रुग्ण उपचार घेत होते? त्या रुग्णाचे नातेवाईक कोण? या तीन रुग्णालयात ओपीडीमध्ये किती जण येऊन गेले? रुग्णाचे नातेवाईक कोणाच्या संपर्कात आले? गावाकडे त्यांच्या संपर्कात किती जण आले आणि ते आता किती लोकांच्या संपर्कात येतील?

प्रशासन खडबडून जागे झाले. आरोग्य विभाग सतर्क झालं. जिल्हाआरोग्य अधिकारी डॉ राधाकिसन पवार यांनी 50 टीम तातडीने तयार केल्या. या सर्व रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांची यादी करणे सुरू केले त्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे काम हाती घेतले. आरोग्य विभागाच्या वॉर रुम मध्ये रात्रभर भीती अन कामाची व्याप्ती वाढत गेली. एका रुग्णामुळे एकमेकांच्या संपर्कात आलेल्या 375 नागरिकाची यादी निघाली. त्या सर्वांना शोधण्याचे काम मध्यरात्री हाती घेण्यात आले. प्रत्येकाची तपासणी करून 375 जणांना आणि त्यांच्या नातेवाईकांना होम क्वारंटईन करण्यात आले.

बीड शहरातील 275 जणांचा यात समावेश होता, तर वडवणी – 9 , गेवराई – 26 , केज -11, धारूर – 1, शिरूर – 5 पाटोदा – 7 , शहागड – 2, माजलगाव – 2 , बीड ग्रामीण भागातील – 37  असे संपर्कात आलेले स्पष्ट झाले. शासनाच्या महाकावच ऍपच्या माध्यमातून या सर्वांवर करडी नजर ठेवली जात आहे. कोरोनाचे संक्रमण होऊ नये म्हणून अचानक मध्य रात्री बीड शहरासह 12 गावं तातडीने सील केले गेले. आठ दिवसासाठी कर्फ्यु लावण्यात आला.

तीन रुग्णालयातील डॉक्टर कर्मचाऱ्यांचे स्वब घेतले
ज्या कोरोना बाधित रुग्णांने तीन रुग्णालयात तपासणी केली उपचार घेतले त्या रुग्णालयातील सर्व डॉक्टर कर्मचारी आणि रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सर्व रुग्णाचे स्वब घेण्यात आले. आता या अहवालानंतर कोरोनाचे संक्रमण किती झाले हे लक्षात येईल.

आपली प्रतिक्रिया द्या