दोन दिवसापूर्वी माजलगाव येथील एका शाळेत अल्पवयीन साडेपाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी त्याच शाळेतील नराधम शिक्षकास पोलिसांनी अटक केली आहे. राहुल अंबादास वायखिंडे (मूळ रा. ब्रह्मगाव ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर) असे आरोपीचे नाव आहे.
बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील एका शाळेतील बालवाडीत साडेपाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना 25 ते 28 सप्टेंबर दरम्यान घडली. या घटनेप्रकरणी मुलीच्या पालकांच्या तक्रारीवरून गुरूवारी अज्ञात व्यक्ती विरोधात लैंगिक अत्याचार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
माजलगाव शहरात एका शाळेत असलेल्या बालवाडीत साडेपाच वर्षाची चिमुरडीवर शाळेतील एका अज्ञात इसमाने 25 ते 28 सप्टेंबर रोजी डबा खाल्यानंतर अत्याचार केला. या घटनेनंतर चिमुरडीच्या पालकांनी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुरूवारी तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्ती विरुद्ध लैंगिक अत्याचार पोस्को गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी सदरील अल्पवयीन मुलीची अंबाजोगाई येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली. या घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय अधिकारी धीरजकुमार बच्चू व पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक सुनील दिंडे यांनी सदरील शाळेची चौकशी करून तेथील सीसीटीव्हीची तपासणी केली. तसेच या शाळेतील सर्व शिक्षकांची ओळख परेड घेतली. पीडित चिमुरडीने आरोपी शिक्षकाचा फोटो पाहून त्याची ओळख पटवली, अशी माहिती तपास अधिकारी सुनील दींडे यांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित शिक्षक राहुल अंबादास वायखिंडे सध्या यास अटक केली आहे.
सदरील नराधम शिक्षक हा 2013 पासून या शाळेत कायमस्वरूपी शिक्षक आहे. तो विविध कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, किर्तन करतो. दरम्यान पोलिसांनी आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता त्यास चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.