बीड – 115 उमेदवारांचे भवितव्य पणाला, 20 लाख 56 हजार मतदार बजावणार हक्क

बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघासाठी 115 उमेदवारांचे 20 लाख 56 हजार मतदार भवितव्य ठरवणार आहेत. सकाळी सात वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरूवात होणार आहे. सहाही विधानसभा मतदारसंघात मोठ्या लढती पाहाण्यास मिळाल्या, प्रशासनाची यंत्रणा सज्ज झाली आहे. साडेतीन हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कर्नाटक आणि झारखंड राज्यातूनही अतिरिक्त चार कंपन्यांची कुमक दाखल झाली आहे. 238 मतदान केंद्राचे थेट वेबकास्टींग केले जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील वॉर रूममधून परिस्थितीवर नियंत्रण ठेवले जाणार आहे. अवघ्या दहा मिनिटात घटनास्थळी प्रशासन पोहचेल अशी तगडी व्यवस्था करण्यात आली आहे. राजकीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. ध्वनीक्षेपण वापरास प्रतिबंध घालण्यात आले असून दारूच्या दुकाना बंद ठेवण्याचे आदेश दिले गेले आहेत.

पंकजा मुंडेवर गलिच्छ व बिभत्स भाषेत टीका, धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल

बीड जिल्ह्यामध्ये सहा विधानसभा मतदारसंघासाठी 115 उमेदवार विजयासाठी मैदानात उतरले आहेत. बीड जिल्ह्यातील 20 लाख 56 हजार 860 मतदार आपल्या मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. निर्भिडपणे मतदान करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. संपूर्ण जिल्ह्यात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रशासन बारीकसारीक घटनेवर करडी नजर ठेऊन आहे. जिल्ह्यामध्ये 238 मतदान केंद्र हे संवेदनशिल आहेत. त्या केंद्राचे थेट वेबकास्टींग केले जाणार आहे. वॉर रूममधून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे प्रशासन प्रयत्न करणार आहे.

बीड विधानसभा मतदारसंघ-
बीड विधानसभा मतदारसंघात 3 लाख 35 हजार 150 मतदार आपला अधिकार बजावणार आहेत. तब्बल 34 उमेदवारांचे भवितव्य पणाला लागले आहे. 334 मतदान केंद्र उभारण्यात आले आहेत. या मतदारसंघात चौरंगी लढत पाहाण्यास मिळत आहे. महायुतीचे जयदत्त क्षीरसागर विरूद्ध आघाडीचे संदीप क्षीरसागर या काका-पुतण्यात थेट लढत होत आहे. तर एमआयएमचे उमेदवार शेख शफीक आणि वंचित आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे आपले नशिब आजमावत आहेत.

परळी विधानसभा मतदार संघ-
परळी विधानसभा मतदारसंघात एकुण 16 उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत. 3 लाख 6 हजार 204 मतदार परळीचा फैसला करणार आहेत. 335 मतदान केंद्र उभारण्यात आले आहेत. राज्यातील सर्वात लक्षवेधक लढत परळी मतदारसंघामध्ये पाहाण्यास मिळत आहे. या मतदारसंघातून राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे विरूद्ध विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे या बहिण-भावामध्ये ही लढत रंगत आहे. प्रचाराच्या रणधुमाळीत सर्वात जास्त आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी या मतदारसंघामध्ये झाडल्या गेल्या आहेत. दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभाही याच मतदारसंघामध्ये झाली आहे. अस्तित्वाची आणि प्रतिष्ठेच्या या लढाईत कोण बाजी मारणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

माजलगाव विधानसभा मतदारसंघ-
माजलगाव विंधानसभा मतदारसंघात 25 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला आज 3 लाख 31 हजार 160 मतदार करणार आहेत. या मतदारसंघात 374 मतदान केंद्र उभारण्यात आले आहेत. या मतदारसंघात अत्यंत शिस्तीमध्ये लढाई लढली जात आहे. कोणतीही संवेदनशिल घटना या मतदारसंघात सहसा घडत नाही. माजी मंत्री प्रकाश सोळंके हे राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत आहेत तर त्यांना मोठे आव्हान उभे केले आहे भाजपाच्या रमेश आडसकर यांनी. प्रकाश सोळंके हे माजी उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळंके यांचे पुत्र आहेत तर रमेश आडसकर हाबाडा फेम माजी आमदार बाबुराव आडसकरांचे पुत्र आहेत. दोन प्रस्थापितांमध्ये कडवी झुंज पाहाण्यास मिळत आहे.

विधानसभा २०१९ – महाराष्ट्रातील चुरशीच्या लढती, वाचा सविस्तर…

गेवराई विधानसभा मतदारसंघ-
गेवराई मतदारसंघामध्ये 19 उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात आहेत. 395 मतदान केंद्र उभारण्यात आले आहेत. 3 लाख 52 हजार 192 मतदार आपल्या मताचा अधिकार बजावणार आहेत. या मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे. विद्यमान भाजपाचे आमदार लक्ष्मणराव पवार यांच्यासमोर राष्ट्रवादीचे विजयसिंह पंडित आणि अपक्ष बदामराव पंडित यांनी आव्हान उभे केले आहे.

आष्टी विधानसभा मतदारसंघ-
आष्टी विंधानसभा मतदारसंघात 9 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 3 लाख 70 हजार 450 मतदार आपला अधिकार बजावणार आहेत. 438 मतदान केंद्र उभारण्यात आले आहेत. बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा मतदारसंघ म्हणून आष्टीची गणना होते. या मतदारसंघात विद्यमान आमदार भीमराव धोंडे हे भाजपाकडून निवडणूक लढवत आहेत तर राष्ट्रवादीचे बाळासाहेब आजबे हे कडवी झुंज देत आहेत.

केज विधानसभा मतदारसंघ-
केज विधानसभा मतदारसंघात एकुण 12 उमेदवार मैदानात आहेत. 3 लाख 61 हजार 704 मतदार आपला अधिकार बजावणार आहेत. 405 मतदान केंद्र उभारण्यात आले आहेत. राखीव मतदारसंघ असणाऱ्या केजमध्ये भाजपाच्या नमिता मुंदडा विरूद्ध राष्ट्रवादीचे पृथ्वीराज साठे यांच्यात थेट लढत होत आहे. परळी विधानसभा मतदारसंघाच्या शेजारचा मतदारसंघ असणाऱ्या केजला राजकीय दृष्टया अनन्यसाधारण महत्व आहे.

असा आहे तगडा बंदोबस्त
राजकीयदृष्ट्या राज्यात संवेदनशिल जिल्हा म्हणून बीड जिल्हा ओळखला जातो. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वच उमेदवारांनी आरोप-प्रत्यारोपाची राळ उठवली. या धुराळ्याचे पडसाद मतदानाच्या दिवशी पडू नयेत यासाठी पोलीस प्रशासन सक्षमपणे मैदानात उतरले आहेत. तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी 3 हजार 500 पोलीस कर्मचारी बंदोबस्तात असणार आहेत. कर्नाटक राज्यातून एक हजार पोलीस जिल्ह्यात दाखल झाले आहेत. झारखंडमधून चार कंपन्या बीडमध्ये पोहचल्या आहेत. 24 सहाय्यक उपाधिक्षक, 129 पोलीस निरीक्षक बंदोबस्तात करडी नजर ठेवून असणार आहेत. राज्य राखीव दलाच्या 6 तुकड्या, 1460 पोलीस कर्मचारी व 300 होमगार्डही बंदोबस्तासाठी असणार आहेत. संवेदनशिल आणि अतिसंवेदनशिल मतदान केंद्रावर जादा कुमक तैनात करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी निर्देश दिले आहेत. मतदान केंद्रनिहाय झोन अधिकारी नियुक्त केले आहेत. क्षणाक्षणाचे अपडेट वॉर रूममध्ये कळवले जाणार आहेत. या व्यतिरिक्त पोलीस मुख्यालयामध्ये राखीव दल ठेवण्यात आले आहे. दंगल नियंत्रण पथकासह अश्रुधुरांच्या नळकांड्याचे वाहन, हेल्मेट, जाळ्या, लाठ्या अशी सुसज्जता ठेवण्यात आली आहे. प्रत्येक मतदारसंघात स्ट्राईकिंग फोर्स, एफएसटी, झारखंड ईको बटालियन, पेट्रोलिंग, व एजीपीओचे पथक तैनात असणार.

18 हजार कर्मचारी दिमतीला
जिल्ह्यतील 6 मतदारसंघात 2321 मतदान केंद्रावर मतदानाची थेट प्रक्रिया पार पडत आहे. 20 लाख मतदारांच्या दिमतीला 18 हजार कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. 4 हजार 288 बॅलेट युनिट वापरले जाणार आहेत. तर कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅड 3069 लागणार आहेत. 6 मतदारसंघात 354 कर्मचारी वर्ग एक चे, 679 कर्मचारी वर्ग 2 चे, 15724 कर्मचारी वर्ग 3 चे तर 1161 शिपाई कर्तव्यावर असणार आहे. लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी मतदारांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

खबरदारी आणि उपाययोजना
बीड जिल्ह्यातील 2321 मतदान केंद्रावर मतदारांना कोणताही त्रास होऊ नये याची खबरदारी घेतली आहे. कडक उन पडले किंवा पाऊस सुरू झाला तर मतदानावर परिणाम होऊ नये याची काळजी घेतली आहे. मतदान केंद्रावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. मतदारांना तक्रार करायची असेल तर ती ही व्यवस्था केली गेली आहे. जिल्ह्यातील 9 मतदान केंद्राच्या स्थळात बदल करण्यात आला आहे. आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये यासाठी हेल्पलाईन आणि टोल फ्रीवर संपर्क साधण्याचेही आवाहन केले गेले आहे. गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले गेले आहेत. मतदान केंद्रामध्ये मतदारांव्यतिरिक्त प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांना पास देण्यात आले आहेत.

यांची असणार करडी नजर
बीड जिल्ह्याची निवडणूक शांततेत पार पडावी हे प्रशासनासमोर आव्हान आहे. त्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्हाधिकारी आस्तितकुमार पाण्डेय, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, निवडणूक पोलीस निरीक्षक बाबुलाल मिना, निवडणूक निरीक्षक प्रांजल यादव, इस्त्राईल इंगटी, सारा दिंदु चौधरी, निवडणूक खर्च निरीक्षक रवी कुमार, कल्याण रेवेल्ला, सी.ओ.अजित कुंभार, निवडणूक अधिकारी प्रविण धरमकर यांची करडी नजर असणार आहे.

सभा संपल्यानंतर पंकजा मुंडे यांना आली चक्कर

आपली प्रतिक्रिया द्या