बीड जिल्हा प्रशासनाची वैद्यनाथाच्या दसरा पालखीला सशर्त परवानगी

कोरोनाच्या संकट काळात बीड जिल्ह्यातील परळी इथल्या प्रभू वैद्यनाथाचा पालखी सोहळा होणार की नाही याबाबत वृत्त सामनाने प्रकाशित केले होते. शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या पालखी सोहळा खंडित होऊ नये यासाठी भक्तांकडून होत असलेली मागणी प्रशासनासमोर मांडली होती.

कोरोना संकटकाळात सर्व नियम पाळून वाहनातून पालखी काढावी अशी संकल्पनाही या वृत्तातून दिली गेली होती. या वृत्तानंतर शेकडो वर्षाची धार्मिक परंपरा असलेला पालखी सोहळा काढण्यासाठी परवानगी द्यावी या आशयाचे पत्र मंदिर प्रशासनाने जिल्हा प्रशासनाला दिले होते.

जिल्हा प्रशासनाने त्यावर आज शनिवारी आदेश काढत पारंपरिक मार्गावर गाडीतून पालखीचे वाहतूक करत हा पालखी सोहळा परंपरेप्रमाणे यावर्षीही निघावा असे सांगितले आहे. यामुळे शेकडो वर्षे चालत आलेली परंपरा कोरोना संकटातही सुरू राहणार असल्याची भावना भाविकांतुन व्यक्त केली जात आहे.

असा असेल प्रभू वैद्यनाथाचा पालखी सोहळा

पारंपरिक वैजनाथाची पालखीची मिरवणूक वाहनातून काढण्यात येईल. सोबत एकण पाच मानकरी यांचे सहभागाने परिक्रमा करावी. परिक्रमा करताना ज्या वाहनातून परिक्रमा करणार आहेत ते वाहन परिक्रमा मार्गावर कुठेही न थांबता कमीत कमी वेळेत पूर्ण करावी.

पाच पेक्षा जास्त भाविकांनी व मानकरी यांनी गर्दी करू नये. संसर्गजन्य स्थिती असल्याने उक्त अटीचे काटेकोरपणे पालन करून परिक्रमा पुर्ण करावी, असे या आदेशात सांगितले गेले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या