अबब! 200 फूट रुंद विहीर, बीडच्या शेतकऱ्याची कमाल

शेतकऱयाच्या मनात आलं तर तो काय करू शकतो याचे उदाहरण बीड जिह्यातील पाडळसिंगी गावात पाहायला मिळत आहे. शेतकरी मारोतीराव बजगुडे यांनी दीड कोटी खर्च करून एक एकरात भलीमोठी विहीर बांधली आहे. ही विहीर 41 फूट खोल आणि 200 फूट रुंद आहे. यामध्ये 10 कोटी लिटर इतका पाणीसाठा करण्यात आला आहे. सध्या राज्यभरात या महाकाय विहिरीची चर्चा रंगली आहे.

धुळे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत मारोतीराव बजगुडे यांची 12 एकर शेती आहे. या भागात पाऊस कमी असल्याने उन्हाळ्यात पाणीटंचाई असते. यावर तोडगा काढण्यासाठी बजगुडे यांना एक एकरात विहीर बांधण्याचा निर्णय घेतला. विहीर बांधण्यासाठी त्यांना नऊ महिन्यांचा कालावधी लागला. तब्बल 80 मजूर यासाठी काम करत होते. 12 हायवा माती आणि दगड काढण्यासाठी लावण्यात आल्या. भलीमोठी विहीर लोकांच्या आकर्षणाचा पेंद्रबिंदू ठरली आहे. बीडमधूनच नव्हे तर शेजारच्या जिह्यांतून शेतकरी विहीर बघण्यासाठी येत आहेत. ही राज्यातील सगळ्यात मोठी विहीर असल्याचा दावा करण्यात येत आहे.

दोन वर्षे पाऊस पडला नाही तरीही यातील पाण्यातून 50 एकर जमिनी भिजू शकते. उत्पन्न वाढवण्यासाठी विहीरीत माशांचे बीजारोपण केले आहे.

माझा शेती आणि मंडपाचा व्यवसाय आहे. शेतीसाठी पाणी नसल्याने अनेक अडचणी निर्माण होतात. आता एक एकरात विहीर बांधली असून 10 कोटी लिटर पाण्याची क्षमता आहे. सध्या ही विहीर तुडुंब भरलेली आहे, असे मारूती बजगुडे यांनी सांगितले.