बीडच्या सीताफळांनी दिल्लीकरांना जिंकलं, शेतकऱ्यांची यशस्वी कहाणी 

उद्धव जोशी । बीड
बीड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने तंत्रशुद्ध पद्धतीने सीताफळांची शेती करून वर्षाकाठी ५० लाखाची कमाई केली आहे. धैर्यशील साळुंके असे त्या शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी पिकवलेल्या सीताफळांना पुणे मुंबई सोबतच दिल्लीतील बाजारपेठांमध्येही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. साळुंकेनी राज्यातील शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श ठेवला आहे.
बीड जिल्ह्यातील धैर्यशील सोळुंके या प्रयोगशील शेतकऱयाने पारंपरिक आणि नगदी पिकांना फाटा देत १० एकरच्या जमिनीत गोल्डन जातीच्या सीताफळाची बाग उभारली. सोळुंके यांनी परिश्रम पूर्वक ३ वर्ष बाग जोपासली त्यानंतर गेल्यावर्षी पासून त्यांच्या या मेहनतीचे फळ त्यांना मिळू लागले. गेल्या वर्षी पुणे मुंबईच्या बाजारात सीताफळ विक्रीतून लाखोंचा नफा झाल्यानंतर त्यानी यावर्षी सीताफळं दिल्लीच्या बाजारात विक्री साठी पाठवली आहेत.
दिल्लीच्या बाजारपेठेत साळुंकेच्या सीताफळांना १२० रूपये किलोचा भाव मिळाला आहे. त्यामुळे यंदाच्या मोसमात त्यांना ४५ टन सीताफळांचे पीक घेतले असून त्यातून त्यांना सर्व खर्च वगळता ५० लाख रूपये नफा मिळणार आहे. सीताफळांची वाढती मागणी लक्षात घेऊन साळुंखेंनी आणखी २० एकरात सीताफळ लागवड केली आहे. येत्या दोन वर्षांत नव्या बागांतील झाडांना सीताफळ आल्यानंतर त्यांचे उत्पन्न दोन कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे.
‘दरवर्षी शेतीचे उत्पादन घटत असल्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमोडत आहे, यातून शेतकरी कर्जबाजारी होत आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी एक पिक पद्धत सोडून वेगवेगळे प्रयोग करायला हवेत. फळांच्या बागा हा एक उत्तम पर्याय आहे. फळ बागांमध्ये सुरवातीचे काही वर्ष मेहनत घ्यावी लागते मात्र नंतर १०० वर्ष या बागांमधून आपल्याला फायदाच होणार आहे’,  धैर्यशील सोळुंके यांनी सांगतात.
आपली प्रतिक्रिया द्या