आरोग्य विभागातील कर्मचाऱ्याकडून नर्सिंगच्या विद्यार्थींनीची काढली छेड

1216

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीडच्या जिल्हा रूग्णालयामध्ये कोविड सेंटर उभारण्यात आले असल्याने दैनंदिन बाह्यरूग्ण विभाग इतर ठिकाणी हलवण्यात आला आहे.दुसरीकडे हलवलेल्या शासकीय रूग्णालयात काम करणाऱ्या नर्सिंगच्या विद्यार्थिनीची आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्याने छेड काढली आहे. याच कारणावरून या विद्यार्थिनीच्या नातेवाईकांनी छेड काढणाऱ्यास रूग्णालयातच चोप दिला. या घटनेने रूग्णालयात मात्र खळबळ उडाली.

बीडच्या जिल्हा रूग्णालयामध्ये कोरोनाग्रस्त रूग्णांवर उपचार करण्यासाठी कोविड सेंटर उभारले आहे आणि तेथील इतर बाह्य रूग्ण तपासणीच्या सुविधा शहरातील दुसऱ्या रूग्णालयामध्ये हलवण्यात आल्या आहेत. अशाच एका रूग्णालयात गुरुवारी शासकीय सेवेमध्ये असणाऱ्या नर्सिंगच्या विद्यार्थिनीची आरोग्य कर्मचाऱ्याकडून छेडछाड झाली. नर्सिंगच्या या विद्यार्थिनीने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्याकडे छेडछाड झाल्याची तक्रार केली. त्यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले. चौकशीसाठी पथक नेमले गेले. पथक त्या रूग्णालयात चौकशीसाठी गेले असता आणि तेथील कर्मचाऱ्याचा जबाब घेणे चालू असताना छेड काढलेल्या मुलीच्या नातेवाईकांनी त्या कर्मचाऱ्यास मारहाण केली. रूग्णालयातच मारामारी सुरू असताना चौकशीसाठी गेलेले पथक भांबावून गेले आणि रूग्ण भयभीत झाले. या अगोदरही संबंधित कर्मचाऱ्यावर छेडछाडीचा आरोप असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी छेड काढल्याप्रकरणी आणि रूग्णालयात मारामारी केल्याप्रकरणी दोन्ही गटावर गुन्हे दाखल करण्याचे पत्र पोलीस प्रशासनाला दिल्याचे समजते.

आपली प्रतिक्रिया द्या