बीडच्या निवडणूक विभागातील रंजक कथा समोर, ‘असा’ मारला 50 लाखांवर डल्ला

1815

बीड लोकसभा आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाच्या खर्चावर बीडच्या निवडणूक विभागाने कसा डल्ला मारला याचे कारनामे समोर येत आहेत. मंडप कामात तब्बल 9 कोटी रूपये फस्त करणाऱ्या अधिकारी आणि ठेकेदारांनी स्टेपलर, पिना, फाईल कव्हर, कोऱ्या कागदावर 50 लाखाचा निधी खर्च करून हात साफ केल्याचे प्रकरण समोर आले आहे. बारीक सारीक गोष्टीच्या खरेदीतही अधिकाऱ्यांनी कशी वाटमारी केली याचा पर्दाफाश होत आहे.

निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेवर खर्चासाठी मंजूर केलेल्या निधीमध्ये कोणी विचारणार नाही या हेतूने बीड लोकसभा आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये अधिकारी आणि ठेकेदारांनी संगनमताने वाढीव आणि जास्तीचे बिले लाऊन मोठी वाटमारी केल्याचे समोर येत आहे. प्रशिक्षणासाठी उभारण्यात आलेल्या मंडपाचे बील 9 कोटी रूपये मंजूर केले. त्यानंतर बॅनर, पाँपलेट आणि जनजागृती कार्यक्रमातून 55 लाख रूपये खर्च केल्याचे दाखवण्यात आल्यानंतर आता त्यापेक्षाही थक्क करणारे प्रकरण उघडकीस आले आहे. निवडणूक काळामध्ये स्टेपलर, स्टेपलरला वापरण्यात येणाऱ्या पिना, फाईल, फाईलला बांधण्यासाठी वापरण्यात येणारा दोरा आणि कोरे कागदं या किरकोळ खरेदीमध्ये सुद्धा तब्बल 50 लाख रूपये इतका खर्च दाखवण्यात आल्याचे उघडकीस येत आहे. भ्रष्टाचाराच्या आणि गैरकारभारचे हे प्रकार चर्चेचा विषय होत आहेत. अशा रंजक कथा निवडणुक विभागाच्या समोर येत आहेत.

लढा चालूच राहणार – अ‍ॅड. अजित देशमुख
बीडमध्ये निवडणूक खर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरकारभार झाला आहे. अनेक प्रकरणेही समोर येत आहेत. या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. आपण निवडणूक आयोग, राज्य सरकार यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. या तक्रारीनंतर आपण पाठपुरावा करून दोषी अधिकाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करण्याची मागणी लाऊन धरणार आहोत. निवडणुकीच्या प्रक्रियेत आणि कामात शिस्त लागेपर्यंत आपला लढा चालूच राहिल असे जनआंदोलनाचे विश्वस्त अ‍ॅड.अजित देशमुख यांनी म्हटले आहे.

निवडणूक खर्चाच्या घोटाळ्याचे शेपूट लांबतच चालले; मुख्य सचिव, निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार

दोन दिवसात पथक बीडमध्ये दाखल होणार
बीड निवडणूक विभागातील अधिकारी आणि ठेकेदारांनी जो नंगानाच केला. वाढीव आणि जास्तीचे बिलं दाखऊन शासनाच्या निधीची खिरापत वाटली त्या गैरकारभाराच्या रंजक कथा समोर आल्यानंतर अव्वर सचिवांनी आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशी करण्यासाठी आठ जणांचे एक पथक नेमले जाणार आहे. हे पथक पारदर्शक चौकशी करून लेखा परिक्षण करणार असल्याचेही माहिती मिळत आहे.

निवडणूक विभागात सन्नाटा
आठ दिवसापूर्वीपर्यंत नेहमी येणाऱ्या-जाणाऱ्यांची वर्दळ, अधिकाऱ्यांचा राबता असणाऱ्या बीड निवडणूक विभागातील परिस्थिती पालटून गेली आहे. त्यांच्या कारनाम्यांचे प्रकरण समोर आल्यानंतर बीड येथील निवडणूक विभागामध्ये चार दिवसापासून सन्नाटा आहे. वरिष्ठ अधिकारी गायब आहेत तर नायब तहसीलदार दिर्घ रजेवर गेले आहेत. कार्यालयामध्ये शिपाईशिवाय कोणीही उपस्थित नाही.

आपली प्रतिक्रिया द्या