बीडचे शिवसेना नगरसेवक शुभम धूत वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डने सन्मानित; कोरोना काळात केलेल्या कार्याचा गौरव

कोरोनाच्या संकटात भीती झुगारून अनेकांना मदतीचा हात देणारे, हजारो कुटूंबाच्या चुली पेटवणारे, माणुसकीचा धर्म पाळत अनेकांना आधार देत या महामारीच्या संकटात मदतीचे महायज्ञ करणारे बीडचे शिवसेना नगरसेवक व राजयोग फाउंडेशनचे अध्यक्ष शुभम दिलीप धूत यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे. या संकटाच्या काळात त्यांनी केलेल्या या कार्यासाठी त्यांना वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डच्या सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

या संकटात त्यांनी भुकेलेल्याना अन्न दिले, अनेकांच्या बंद चुली पेटवण्यासाठी जीवनावश्यक साहित्य दिले, रुग्णालयात उपचारासाठी पैसे नसलेल्यांचे बिले भरले, तर गरज असलेल्याना रक्त दिले. त्यांनी मदतीचा हात दिल्याने हजारो कुटूंबाचे जगणे सोपे झाले. याच कामाची पावती त्यांना मिळाली आहे.त्यांना वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डच्या सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत सर्वसामान्यांसाठी केलेल्या या कार्याचा वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डने गौरव केला आहे. सर्वात कमी वयात पुरस्कार मिळवणारा तरुण म्हणूनही शुभम यांचा गौरव करण्यात आला. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डचे महाराष्ट्र उपाध्यक्ष महेबूब सय्यद, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड होल्डर आदम सय्यद, मराठी चित्रपट निर्माते सिकंदर सय्यद, रुमा सय्यद यांच्याहस्ते हा पुरस्कार पुण्यातील हॉटेल हयात येथे शुभम धुत यांना शुक्रवारी प्रदान करण्यात आला.

कोरोना संकटकाळात सकाळपासून संध्याकाळपर्यंत शुभम यांचे मदतीचे कार्य सुरू होते. वार्डावॉर्डात जाऊन मदतीचे वाटप ते करत होते. मंदिर, मशीद, आश्रम अशा ठिकाणी राहणाऱ्यांना त्यांनी किराणा सामान पोहोचवले. शहरातील हजारो नागरिकांना मदत पोहोचवून वाडी वस्तीसह जिल्ह्यातील 100 गावांमध्ये जाऊन आवश्यक मदतीचा ओघ पोहोचवल. बीड शहरासह ग्रामीण भागात सतत 50 दिवस राजयोग फाउंडेशनच्या माध्यमातून अन्नधान्य व किराणा साहित्य वाटप करण्यात आले. राज्यात सर्वत्र रक्ताचा तुटवडा असताना अत्यावश्यक रुग्णांसाठी त्यांनी स्वत: 3 वेळा रक्तदान केले. गरजू कुटुंबांना दिवाळी व ईद साजरी करण्यासाठी आवश्यक साहित्य वाटप केले. या कार्यासाठी त्यांचा वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडनच्या वतीने गौरव करण्यात आला.

पुरस्काराचे  आणखी मान्यवर मानकरी
वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडनतर्फे जगभरातील 100 देशांमध्ये ग्लोबल प्लेज कॅम्पेन हा उपक्रम सुरू आहे. कोरोना काळात प्रभावी, आणि सर्वोत्कृष्ठ, कारागिरी बजावणारे राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या सन्मान जागतिक स्थरावर केला जात आहे. यात मंत्री नवाब मलिक, राज्यमंत्री आदिती तटकरे, आमदार निलेश लंके, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार झिशान सिद्धिकी, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह इतर राजकीय क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश आहे.

आई वडिलांच्या प्रोत्साहनाने बळ मिळाले
हा सन्मान माझा एकट्याचा नसून बीड शहराचा, बीड जिल्ह्याचा आहे. तसेच माझे आई-वडील, सर्व मित्रपरिवार व कुटुंबासह लॉकडाउन काळात मला मार्गदर्शन करणार्‍या प्रत्येकाचा आहे. आई वडिलांच्या प्रोत्साहनाने आपल्याला बळ मिळाले. सर्वांच्या शुभेच्छा व मार्गदर्शन कायम राहावे. आपण वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडनच्या टिमचे आभार मानतो,असे शुभम धुत यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या