सीमा भागात प्रचंड तणाव, हुतात्मादिनी कानडी पोलिसांची दंडेलशाही

468

मराठी भाषिकांची मुस्कटदाबी करणाऱ्या कर्नाटक सरकार आणि कानडी पोलिसांनी आता अत्याचाराची परिसीमा गाठली आहे. हुतात्मा दिनी आज बेळगावात हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आलेले शिवसेनेचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना कानडी पोलिसांनी धक्काबुक्की करीत हुतात्म्यांना आभिवादन करू दिले नाही. राज्यमंत्री यड्रावकर यांची धरपकड करण्यात आली. तसेच हुतात्म्यांना अभिवादन करणारा फलक काढून दडपशाहीचा कहरच केला आहे. यामुळे सीमा भागात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, शनिवारी (दि. 18) शिवसेना नेते, खासदार संजय राऊत बेळगावात धडक देणार आहेत. कितीही रोखण्याचा प्रयत्न केला तरी मी शनिवारी बेळगावला जाणारच, असा निर्धार संजय राऊत यांनी केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सीमा भागात मराठी भाषिकांची जाणीवपूर्वक गळचेपी करण्यात येत आहे. मध्यवर्ती एकीकरण समितीच्या नेत्यांना सीमेवर बंदुकीतून गोळ्या घालण्याची भाषा करणाऱया तथाकथित भुरटय़ा नेत्यामुळे वातावरण बिघडले असताना त्याच्यावर कारवाई करण्याऐवजी कानडी पोलिसांकडून मराठी भाषिकांवरच दंडेलशाही करण्यात येऊ लागली आहे. त्याचाच भाग म्हणून दरवर्षी बेळगाव परिसरात होणारी मराठी साहित्य संमेलने दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. महाराष्ट्रातून येणाऱया साहित्यिकांनाही येण्यास मज्जाव करण्यात आला. परंतु मराठी भाषिक जनतेने ही नियोजित साहित्य संमेलने यशस्वीपणे पार पाडली. दरवर्षीप्रमाणे आज सकाळी बेळगाव येथील हुतात्मा चौकात हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. या चौकातून मूक फेरी काढण्यात आली. कंग्राळी येथेही हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. या वेळी बेळगाव, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, असा निर्धारही हुतात्म्यांना स्मरून करण्यात आला. या वेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, मालोजी अष्टेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, बंडू केरवाडकर, दिलीप बैलूरकर, अरविंद नागणुरी, माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणू किणेकर आदी मराठी भाषिक सीमा बांधव मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

व्याख्यानमालेचे शनिवारी उद्घाटन

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत शनिवारी (दि. 18) बेळगावात धडकणार आहेत. बेळगावातील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने दरवर्षी बॅरिस्टर नाथ पै. व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. पाच दिवस ही व्याख्यानमाला असते. व्याख्यानमालेचे उद्घाटन शिवसेना नेते संजय राऊत यांच्या हस्ते होणार आहे. गोगटे रंगमंदिर वेंगुर्ला रोड येथे दुपारी साडेचार वाजता हा कार्यक्रम होणार आहे. दरम्यान, संजय राऊत यांना बेळगावात येण्यास मज्जाव केला असून कानडी प्रशासनाने तसे फर्मानही काढले आहे. व्याख्यानमालेच्या आयोजकांना दमदाटी सुरू केली आहे. यामुळे मराठी भाषिकांमध्ये तीक्र संताप व्यक्त होत आहे.

दरवर्षी हुतात्म्यांना अभिवादन

बेळगाव, निपाणी, बिदर, भालकीसह 865 मराठी भाषिक गावांचा जबरदस्तीने तत्कालीन म्हैसूर राज्यात समावेश करण्यात आला. 16 जानेवारी 1956 रोजी तशी आकाशवाणीवर घोषणा केली होती. दीडशे वर्षांच्या इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाची नुकतीच सुटका झाली असतानाच आता परत परभाषिक मुलखात इच्छेविरुद्ध जावे लागणार असल्याने बेळगावसह सीमा भागात आगडोंब उसळला. दुसऱयाच दिवशी दि. 17 जानेवारी रोजी सीमाबांधव रस्त्यावर उतरले असता कानडी पोलिसांनी बेछूट गोळीबार केला. यात पैलवान मारुती बेन्नाळकर यांच्यासह चार जण बेळगावात हुतात्मा झाले, तर दि. 18 जानेवारीला निपाणीत कमळाबाई मोहिते यांनी हौतात्म्य पत्करले. मराठी भाषिक सीमा भागात दरवर्षी या सर्व हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येते.

शिवसेना नेते संजय राऊत शनिवारी धडक देणार, कोणीही रोखण्याचा प्रयत्न केला तरीही बेळगावला जाणारच!

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत हेही शनिवारी बेळगावात जाणार आहेत. खासदार राऊत यांच्या बेळगाव प्रवेशावर कर्नाटक सरकारने बंदी घातली आहे. पण बेळगावात भरवण्यात आलेल्या साहित्य संमेलनाचे मला निमंत्रण आहे. बेळगाव हे हिंदुस्थानात आहे, पाकिस्तानात नाही. कोणी कितीही रोखण्याचा प्रयत्न केला तरी मी उद्या बेळगावात जाणारच, असे खासदार राऊत यांनी ठणकावून सांगितले आहे. कर्नाटक सरकारने घातलेली बंदी ही कायदा आणि घटनेला धरून नाही. त्यामुळे तिथे जाण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही. मी उद्या दुपारी दोन वाजता बेळगावात साहित्य संमेलनाला उपस्थित राहणारच, असेही त्यांनी बजावले.

कोगनोळी टोलनाक्यापासून पोलीस बंदोबस्त

हुतात्मा दिनी बेळगावात महाराष्ट्रातून एकही लोकप्रतिनिधी येऊ नये म्हणून सकाळपासूनच कोगनोळी टोलनाक्यापासून कानडी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. मात्र शिवसेनेचे मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हे एसटीने बेळगावमध्ये दाखल झाले, तर रिक्षातून ते हुतात्मा चौकात अभिवादनासाठी आले. या वेळी पोलिसांकडून त्यांना धरपकड करण्यात आली. मी महाराष्ट्राचा राज्यमंत्री असल्याचे यड्रावकर यांनी सांगितले. तरीही कनिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने अरेरावी केली. तसेच जबरदस्तीने मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना पोलीस बंदोबस्तात घेऊन बेळगाव हद्दीबाहेर सोडले. यामुळे सीमा भागातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या