महाराष्ट्रातील साहित्यिक आणि वक्त्यांना संमेलनाला बोलावू नका, बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

348

कर्नाटकातील कानडींचा मराठीद्वेष पुन्हा समोर आला आहे. कडोली आणि येळ्ळूर साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्रातील साहित्यिक आणि वक्त्यांना बोलावू नका, अशी सूचना बेळगावचे जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोमनहळ्ळी यांनी साहित्य संमेलन आयोजकांच्या बैठकीत केली. त्यामुळे महिन्यापूर्वीच निमंत्रणे पाठवली गेल्याने आता काय करायचे, असा प्रश्न आयोजकांना पडला आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील मराठी बांधव आपली मराठी संस्कृती जोपासण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून साहित्य संमेलनांचे आयोजन करतात. परंतु मराठीद्वेष्टय़ा कर्नाटक सरकारकडून ही मराठी साहित्य संमेलने उधळून लावण्याचेच उद्योग सुरू आहेत. गेल्या रविवारी इदलहोंड येथील संमेलनाला अध्यक्ष म्हणून आलेले ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांना कर्नाटक पोलिसांनी संमेलनाला जाण्यास मज्जाव केला होता. त्याबद्दल सबनीस यांनी कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध केला होता.

कडोली आणि येळ्ळूर येथेही साहित्य संमेलने होणार आहेत. त्याची निमंत्रणेही पाठवली गेली आहेत. संमेलनाच्या आयोजकांनी डॉ. सबनीस यांना मज्जाव झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज सकाळीच बेळगावच्या जिल्हाधिकाऱयांची भेट घेतली होती. त्यांनी आयोजकांना सायंकाळी बैठकीसाठीही बोलवले होते. सीमावर्ती भागातील वातावरण तणावपूर्ण असल्याने महाराष्ट्रातील साहित्यिक आणि वक्त्यांना न बोलावता संमेलन घ्या, अशा सूचना त्यांनी आयोजकांना केल्या.

आपली प्रतिक्रिया द्या