घंटानाद

593

 

अरुण म्हात्रे

टा… घंटानाद… मग तो चर्चमधील असो वा मंदिरातील… दोन्हींना जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणजे संगीत… संगीताच्या माध्यमातून ईश्वराची आराधना…

वाज घंटेचा. शांत चराचरावर पवित्रतेचा… शुभ शकुनाचा घनगंभीर चरा उमटवणारा, घुमत राहणारा आवाज… घंटानाद! टण् टण् टण् टण्…

अर्थात हा आवाज आता या क्षणाला हिंदूंच्या मंदिरातून येत नाही. हा आवाज येतो, येशू आणि मेरीच्या पवित्र स्मृतींना जागृत ठेवणाऱ्या शांत निस्तब्ध चर्चच्या आवारातून! हा आवाज येतोय २५ डिसेंबरच्या झगमगीत दिवसाच्या शुभ्र पायऱ्यांवर पाऊल टाकणाऱ्या खिसमस नाताळ सणाच्या लालपांढऱ्या झग्यातून…! वातावरणात एक गार लहर पवित्र खिसमसच्या वाऱ्याची… रात्रीची गहिरी शांतता एखाद्या प्रेषिताला आकाशातून पृथ्वीवर उतरण्यासाठी लागणारी… घराघरांवर चांदण्या लटकलेल्या… जणू आकाशातून प्रेषिताच्या स्वागतासाठी काही नक्षत्रे भूतलावर उतरलीत… खिसमस बाबाचे पुतळे चौकाचौकात… २५ च्या रात्री तो मुलाबाळांना खेळणी, चॉकलेटस्, केक आणि प्रेझेंटस् घेऊन येणार आहे. आणि त्याच्या येण्याची वर्दी देणार आहे चर्चमधील घंटांचा तो घनगंभीर नाद… टण् टण्… टण् टण्…

हिंदुस्थानातील खिश्चन धर्मीयांच्या उगमाचा इतिहास कितीही क्लेषदायी असला, त्याला धर्मांतराच्या अमानुष घटनांची पार्श्र्वभूमी असली तरी एक स्वतंत्र धर्म म्हणून ‘खिस्ती’ धर्मपंथाची एक आगळी वेगळी शान आहे. युरोपातील काहीशा सुशिक्षित, सॉफिस्टिकेटेड जगण्याच्या पद्धतीची दाट छाया असलेला हा धर्म, त्यांच्या वेगळ्या चालीरीतींमुळे किंवा पेहेरावाच्या शुभ्र पद्धतींमुळे अनेकांना आकर्षित करतो. हिंदूंच्या देवळातील गर्दी, असंख्य आवाज, कलकलाट आणि देशी अस्ताव्यस्तपणाच्या पार्श्र्वभूमीवर चर्चमधील शांतता, टापटीपपणा, स्वच्छता आणि त्याला भारदस्तपणा देणाऱ्या घंटानादामुळे, हा धर्म मानवाच्या अंतस्थ हृदयातील वेदनांचा, भावनांचा सूक्ष्मपणे विचार करतो असा भाव निर्माण होतो. आणि याला पाश्र्वभूमी असते. येशूच्या असामान्य त्यागाची! त्याच्या जग पापमुक्त करण्याच्या विश्वव्यापी इच्छेची आणि जगाला शांतीचा विचार देणाऱ्या त्याच्या पवित्र आकाशवाणीची! येशूच्या भारदस्त आकाशवाणीला तशीच भारदस्त साथ असते ती चर्चबेलची… अंतराअंतराने वाजणाऱ्या चर्चवरच्या प्रचंड मोठ्या घंटेच्या वातावरण भारून टाकणाऱ्या आवाजाची…!!

जणू हा घंटानाद समस्त खिस्तीजनांना जागे करतो आणि जगातल्या सर्व दु:खितांना येशूचा हवाला देत, चर्चमध्ये येण्याचं निमंत्रण देतो…!

घंटानादात असते एक हाक… एक ताकद… एक प्रेमळ निमंत्रण.. एक आशावाद… हा एक पवित्र स्वराकाश निर्माण करणारा नाद असतो! योगायोग पहा… खिस्ती बांधवांना त्यांच्या चर्चबेल जाग्या करतात, तर हिंदूंना त्यांच्या मंदिरातील घंटानाद, ईश्वराच्या अस्तित्वाची खात्री देतो. ज्या कोणी या ‘घंटा’ नावाच्या वाद्याचा वा यंत्राचा शोध लावला, त्याला या धातूच्या टणत्काराने होणाऱ्या आवाजाचा किती अभ्यास असणार? कारण इतर कोणतेही वाद्य आणि घंटा यांच्यात आवाजाच्या पोताचा जो फरक असतो तो लक्षणीय असतो…

घंटेच्या आवाजात जी आवाहकता आहे, ती चैतन्यमय तर असतेच, पण त्यात एक धार्मिकपण… एका सामूहिक एकोप्याचीही नादमयता असते… हिंदूंच्या आरत्या चालू असतानाचा घंटानाद आणि चर्चच्या शिखरावरून येणाऱ्या चर्चबेलचा घनगंभीर आवाज यात ईश्वराशी तादात्म्य पावण्याची वा ईश्वराच्या जवळ जाणाऱ्या नादाची मानवी शृंखला असते!

त्यातूनच अनेक छोट्यामोठ्या घंटानादाचा उगम झालेला आपण पाहतो. चर्चची बेल.. मंदिरातील घंटा… घड्याळाचे टोल… सायकलची बेल… दरवाजाची बेल… शाळेची घंटा… रेल्वेची घंटा… अ‍ॅम्ब्युलन्सवरची बेल… बोट सुटतानाची बेल… आयुष्यात आपल्याला सामोऱ्या येणाऱ्या असंख्य घंटानादाच्या या छोट्यामोठ्या आवृत्त्या माणसाच्या सुप्त ग्रंथींना जागे करण्याच्या प्रक्रियेशी संबंधित आहेत… इतक्या मोठ्या धर्मव्यवस्थांना, ‘घंटा’ नावाच्या गोष्टीची गरज भासली, त्याचे कारण नक्कीच शास्त्रीय असेल… कारण भक्तावर, भाविकांवर, धर्माची सत्ता भारदस्तपणे चालवायची असेल तर त्याला घंटेच्या घुमत जाणाऱ्या आवाजाची साथ हवी!

घंटेच्या आवाजाचा जरा बारकाईने अभ्यास केला तर त्यांचा आवाज मंगल वा पवित्र असतो या वैशिष्ट्यापेक्षा महत्वाचे म्हणजे तो आवाज कामुक नसतो. वासनादी भाव चेतवणारा नसतो, तर एक प्रकारची मेंदूतील शांतता निर्माण करणारा असतो. मंदिरातील प्रवेशद्वाराजवळील घंटा या मंदिराबाहेर जशा आपण चपला बाहेर काढून ठेवतो तशा मनातील ईश्वराशिवायचे सर्व ऐहिक विचार थोपवणाऱ्या भक्ताला सज्जतेचा इशारा देणाऱ्या किंवा गाभाऱ्यातील ईश्वराला तुमच्या येणाऱ्या संकेत देणाऱ्या असतात! सर्वच धर्म सांगतात, ‘‘आधी नि:शब्द व्हा, स्तब्ध व्हा.. शांत व्हा… घंटानादासारखे एकचित्त व्हा… एकाग्र व्हा… येथे पवित्र वास्तूत तुमचा आवाज नको… धातूंच्या आघातातून होणाऱ्या पवित्र तरंगांचा आवाज होऊ दे… तो ईश्वरापर्यंत… प्रभूपर्यंत पोहोचेल…!’’ एवढीशी घंटा, पण तिचे सांगणे एवढे व्यापक असते…!

असे म्हणतात, ईश्वराला इतके सूक्ष्म आवाज ऐकू येतात की मुंगीच्या पायात बांधलेल्या घुंगराचा आवाजदेखील त्याला ऐकू येतो. मग इतक्या मोठ्यामोठ्याने मंदिर – मशिदीवर लावलेले स्पीकर्स कशाला? ढोल/नगारे कशाला, कान किटून टाकणाऱ्या आवाजात आरत्या कशाला? शंखनाद कशाला? असा प्रश्न निर्माण होतो. एक घंटानाद प्रभूला जागे करायला वा प्रभूच्या पुढ्यात गेल्यावर आपल्याला जागे करायला पुरेसा नाही का? घंटा शांतपणे ऐकल्या की हा शोध लागतो… खिस्ती बांधवांच्या चर्चवरील घंटानादांनी, चर्चबेलने मात्र अजून तो भारदस्तपणा टिकवला आहे. येत्या खिसमसला आपण त्याचा अनुभव घेणार आहोत. तुम्ही हिंदू असा वा मुसलमान. येशूच्या पवित्र अस्तित्वाची जाणीव देणारी चर्चबेल,  आपल्याही आयुष्यात समाधानाची ‘बेल’ वाजवेल… हे नक्की.

 

आपली प्रतिक्रिया द्या