हत्या झालेले बेनेट यांचे धड प्रभादेवी चौपाटीवर सापडले

2532

मानलेल्या मुलीने हत्या केल्यानंतर शरीराचे तुकडे करून फेकलेल्या बेनेट रिबेलो यांच्या कमरेपासूनचा वरचा भाग शुक्रवारी प्रभादेवी समुद्रकिनाऱयावर सापडला. आता केवळ डाव्या पायाचा घुडघ्यापासूनचा खालचा पाय मिळायचा बाकी आहे.

वाकोला येथे राहणाऱया बेनेट रिबेलो यांची त्यांच्याच रिया (19) या मानलेल्या मुलीने तिच्या 16 वर्षीय प्रियकराच्या मदतीने हत्या केली होती. त्यानंतर दोघांनी बेनेटच्या शरीराचे तुकडे करून ते सुटकेस तसेच पिशव्या आणि बबल रॅपमध्ये भरून मिठी नदीत फेकले होते. 2 तारखेला माहीम समुद्रकिनारी एक सुटकेस सापडली होती. त्यात पाय, हात आणि गुप्तांग सापडले होते. त्यातच शर्ट, पॅण्ट आणि स्वेटर देखील सापडले होते. शर्टच्या टेलर मार्कवरून गुन्हे शाखा युनिट-5 च्या पथकाने ज्या मृत व्यक्तीचे ते अवयव होते त्याचा शोध लावून आरोपींना अटक केली होती. त्यानंतर उर्वरित अवयवांचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली होती. शु्क्रवारी प्रभादेवी समुद्रकिनाऱयावरून एक तरुण जात असताना त्याच्या नजरेस मानवी अवयव पडला. त्याने लागलीच पोलीस नियंत्रण कक्षाला संपर्क साधून त्याबाबत माहिती दिली. दादर पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन तो मानवी अवयव ताब्यात घेतला.

लोखंडी रॉड अन् बांबू, चाकूच्या जखमा
बेनेट 12 वर्षांचे असताना त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला होता. तेव्हा पायात लोखंडी रॉड टाकला होता. आज सापडलेल्या मांडीवरच्या अवयवात लोखंडी रॉड मिळाला आहे. त्यावरून आज सापडलेला अवयव बेनेट यांचा असल्याचे स्पष्ट झाले. तसेच त्या अवयवावर बांबू व चाकूने मारल्याच्या जखमा देखील आढळल्या आहेत. पोलीस आता या अवयवांची डीएनए तपासणी करणार आहेत.

10 तारखेला मिठी नदीच्या पात्रात मरून रंगाची बॅग सापडली त्यात पायाचा अर्धा भाग आणि हात सापडला. 11 तारखेला बेनेटच्या पायाचा आणखी अर्धा भाग मिठी नदीत सापडला होता.
आज प्रभादेवी समुद्रकिनारी बेनेटचा कमरेपासूनचा वरचा भाग सापडला. आता डाव्या पायाचा अर्धा भाग मिळणे बाकी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या