माहीमनंतर मिठी नदीत दुसरी सुटकेस सापडली, सुटकेसमध्ये डावा पाय व उजवा हात

833

मानलेल्या मुलीने तिच्या अल्पवयीन प्रियकराच्या मदतीने बेनेट रिबेलो (59) यांची हत्या केल्यानंतर शरीराचे तुकडे करून ते ज्या सुटकेसमध्ये भरून फेकले होते त्यापैकी दुसरी सुटकेस आज मिठी नदीच्या पात्रात सापडली.  त्या सुटकेसमध्ये गुडघ्यापासून खालचा डावा पाय आणि उजवा हात सापडला आहे.

2 डिसेंबर रोजी माहीमच्या मगदुम बाबा शहा दर्ग्याच्या मागच्या बाजूला समुद्रकिनारी एक अज्ञात सुटकेस सापडली होती. त्या सुटकेसमध्ये अज्ञात पुरुषाचे लिंग, डावा हात आणि उजवा पाय सापडला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच गुन्हे शाखा युनिट-5 चे प्रभारी पोलीस निरीक्षक जगदीश साईल, पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण व पथकाने शिताफीने तपास करून ते अवयव वाकोला येथे राहणाऱ्या बेनेट रिबेलो यांचे असल्याचे शोधून काढले. तसेच बेनेटची त्याच्याच मानलेल्या मुलीने अल्पवयीन प्रियकराच्या मदतीने हत्या केली व मृतदेहाचे तुकडे करून ते तीन सुटकेसमध्ये भरले आणि त्या सुटकेस मिठी नदीच्या पात्रात फेकल्याचे तपासात समोर आले होते. त्यामुळे पोलिसांनी स्थानिक मच्छीमार बोटींची मदत घेऊन अन्य दोन सुटकेसचा शोध सुरू केला होता. त्यापैकी दुसरी सुटकेस आज  वांद्रे-कुर्ला संकुलातील मिठी नदीच्या पात्रात आज दुपारी सापडली. त्या सुटकेसमध्ये डावा पाय आणि उजवा हात सापडला. आता पोलीस तिसऱ्या सुटकेसचा शोध घेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या