हिरोगिरी करायला गेला; हत्तीला किस करण्याच्या प्रयत्नात जखमी झाला

186

सामना ऑनलाईन । बंगळुरू

चित्रपटाचा प्रभाव एका युवकाला चांगलाच महागात पडला आहे. चित्रपटात नायकाने केलेली गोष्ट करण्याचा प्रयत्न या तरुणाने केला आणि तो थेट रुग्णालयात दाखल झाला. एका चित्रपटात नायक हत्तीला प्रेमाने जवळ घेऊन किस करतो असे दृश्य या तरुणाने पाहिले होते. त्याच्यासमोर हत्तींचा कळप आल्यावर त्यानेही हत्तीला किस करण्याचा प्रयत्न केला आणि थेट रुग्णालयात पोहचला आहे. पोलीस आणि वनविभागाचे कर्मचारी कर्नाटकातील मालूरच्या जंगलातून सहा हत्तींच्या कळपाला कर्नाटक तामीळनाडू सीमेजवळच्या जंगलात पिटाळत असताना ही घटना घडली आहे.

आठवड्याभरापसून सहा हत्तींचा कळप जंगलात पिटाळून लावण्यासाठी वनविभाग आणि पोलीस प्रयत्न करत आहेत. या हत्तींच्या कळपाने डीएन आणि डोड्डी गावातील बागा आणि शेतीत धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे या हत्तींना पुन्हा जंगलात पिटाळण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. वनविभागाने परिसरात फिरकू नये असे निर्देश दिले असतानाही ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमा झाले होते. त्यातील काहीजण हत्तींच्या कळपाचे फोटो घेत होते. काहीजणांनी सेल्फी घेण्याचाही प्रयत्न केला. जमावाला पाहून हत्तींचा कळप बिथरला. हत्ती जमावाच्या मागे धावत होते. त्यामुळे जमावाने पलायन करत प्राण वाचवले. जमावाजवळच राजू नावाचा युवक बेशुद्ध पडल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिसले. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. हत्ती मागे लागल्यामुळे तो कोटरी झाडात अडकून पडला होता.

या घटनेचा तपास केला असता वनअधिकाऱ्यांना आश्चर्यकारक माहिती मिळाली. हत्तींचा कळप दिसल्यावर राजू गावकऱ्यांना एका कन्नड चित्रपटाबाबत सांगत होता. त्या चित्रपटात नायक हत्तीला प्रेमाने जवळ घेऊन त्याला किस करतो त्या घटनेबाबत त्याने सांगितले. त्या नायकासारखे मी तुम्हाला करून दाखवतो असे सांगत तो हत्तींच्या कळपाजवळ पोहचला. त्यानंतर हत्ती बिथरल्याचे उघड झाले आहे. नायकाचे अनुकरण करण्याच्या नादात हा युवक रुग्णालयात दाखल झाला आहे. याबाबतचे वृत्त एनबीटीच्या संकेतस्थळाहून प्रसिद्ध करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या