कारमधील एसी चालत नसल्याने ग्राहकाने ‘ओला’ला न्यायालयात खेचले, मिळवली 15 हजारांची नुकसानभरपाई

बंगळुरूतील एका व्यक्तीने ओला कॅबमधील एसी चालत नसल्याने कंपनी विरोधात तक्रार दाखल केली आहे. कंपनीने अॅग्रीगेटर कडून घेतलेल्या कारचे एअर कंडीशनर आठ तास बंद असल्याने सदर तक्रार करण्यात आल्याचे समजते. अलीकडेच या खटल्याची सुनावणी ग्राहक न्यायालयामध्ये करण्यात आली. न्यायालयाने कंपनीला ग्राहकाचे भाडे परत करण्याचे आदेश दिले तसेच ग्राहकाला त्रास दिल्याबद्दल 5 हजार रूपयांचा दंड ठोठवण्यात आला. त्याव्यतिरिक्त न्यायालयीन खर्चासाठी 10 हजार रूपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले.

ओला कंपनीच्या गाडीचा एसी चालत नसल्याने ग्राहकाने या कंपनीसह त्याचे संस्थापक भविश अग्रवाल यांना न्यायालयात खेचण्याचा निर्णय घेतला होता. विकास भूषण असं या ग्राहकाचे नाव असून त्याने 8 तासांसाठी ओलाची कार घेतली केली होती. या 8 तासात गाडीचा एसी न चालल्याने भूषण यांनी ओला कंपनीला सेवेत कमतरतेबद्दल न्यायालयात खेचण्याचं ठरवलं होतं. ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण करणाऱ्या न्यायालयाने या विकास भूषण यांचे म्हणणे ऐकून घेत ओला कंपनीला 15 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. यातले 5 हजार रुपये हे भूषण यांना खटला लढण्यासाठी आलेला खर्च म्हणून तर 10 हजार रूपये हे नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

18 ऑक्टोबर 2021 रोजी भूषण यांनी ओलाची कार बुक केली होती. प्राईम सेडान या प्रकारातली सर्वाधिक भाडे असणारी गाडी त्यांनी बुक केली होती. भूषण यांना जवळपास 80 किलोमीटरचा प्रवास करायचा होता. ही गाडी आरामशीर असेल आणि एसी असेल असं सांगण्यात आलं होतं, मात्र गाडीतला एसी चालतच नव्हता ज्यामुळे भूषण आणि त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्यांना घामाघूम व्हायला झालं होतं. भूषण यांनी या गाडीसाठी 1,837 रुपये मोजले होते. भूषण यांनी ओला कंपनीच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधून पैसे परत द्यावे अशी मागणी केली, ज्यावर ओला कंपनीने त्यांना नकार दिला. यामुळे भूषण यांनी ओलाचे संस्थापक भविश अग्रवाल यांच्याशी ईमेल आणि ट्विटरवरून संपर्क साधायचा प्रयत्न केला, मात्र त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर भूषण यांनी 11 नोव्हेंबर 2021 मध्ये राष्ट्रीय ग्राहक मदत केंद्राशी संपर्क साधला आणि आपल्याला पैसे परत मिळावे अशी मागणी केली. यावर ओला कंपनीने आपली चूक मान्य केली मात्र पैसे परत देण्यास नकार दिला. ओला कंपनीने दिलगिरी म्हणून भूषण यांना 100 रुपयांचे कूपन दिले. या प्रकारामुळे संतापलेल्या भूषण यांनी मे 2022 मध्ये जिल्हा ग्राहक तक्रार निवारण केंद्रात दाद मागितली होती. ओला कंपनीने केलेल्या ईमेलमध्ये त्यांनी चूक मान्य केली होती, हे दाखवत ग्राहक तक्रार निवारण केंद्राने ओला कंपनीला भूषण यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. ही नुकसान भरपाई 60 दिवसांत ग्राहकाला दिली पाहिजे असेही आदेशात म्हटले आहे.

आहे.