बंगळुरू हिंसाचार – आमदाराच्या पुतण्याचे शिर कलम करण्यासाठी मेरठमधील नेत्याकडून 51 लाखांचे बक्षीस

1020

बंगळुरमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मेरठमधील नेते शाहजेब रिझवी यांनी आमदार आर. अखंड श्रीनिवास मूर्ती यांचा पुतण्या पी. नवीन याचे शिर कलम करणाऱ्यास 51 लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे. रिझवी यांचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. रिझवी समाजवादी पक्षाचे नेते आहेत. मेरठमधील फलावदा भागात सामाजिक कार्यकर्ते अशी त्यांची ओळख आहे.

बंगळुरूमध्ये आमदार श्रीनिवास मूर्ती यांचा पुतण्या पी.नवीन यांनी सोशल मिडीयावर केलेल्या आक्षेपार्ह पोस्टवरून शहरात धार्मिक हिंसाचार उफाळला. त्या हिंसाचारात 3 जणांचा मृत्यू झाला असून काही पोलीस जखमी झाले. त्यांच्या पोस्टनंतर मंगळवारी जमावाने हिंसाचाराला सुरुवात केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. त्यात 3 जणांचा मृत्यू झाला. तसेच काही पोलीस जखमी झाले. या हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी 147 जणांना अटक केली आहे. तर काहीजणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. नवीन यांच्या पोस्टवर मेरठमधील समाजवादी पक्षाचे नेते शाहजेब रिझवी यांनी चिथावणीखोर वक्तव्य केले आहे. त्यांनी पी. नवीन यांचे शिर कलम करणाऱ्यास 51 लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओची दखल घेत उत्तर प्रदेश पोलिसांनी कारवाईला सुरूवात केली आहे. चिथावणीखोर भाष्य़ करून हिंसाचार भडकवण्याचा गुन्हा शाहजेब रिझवी यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. तसेच चौकशीला सुरुवात करण्यात आली असून या प्रकरणी कठोर कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या