दाढी केली नाही म्हणून सिनीअर विद्यार्थ्यांकडून मारहाण, आरोपींवर गुन्हा दाखल

बंगळुरूमध्ये दाढी करण्यास नकार दिल्याने विद्यार्थ्याला सिनिअर विद्यार्थ्यांनी मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. ही घटना बंगळुरूच्या कृपानिधी ग्रुप इंस्टिट्यूशनमध्ये घडली असून याप्रकरणी मारहाण करणाऱ्या विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

झेविअर इसाक, विष्णू आणि शरथ अशी आरोपींची नावे आहेत. गौतम असे पीडित मुलाचे नाव असून त्याने एप्रिलमध्य़े कॉलेज सुरु झाल्यापासून हे सिनिअर्स त्याला दाढी करून यायला मागे लागले होते. मात्र गौतमने दाढी करण्यास नकार दिला. नंतर या सिनिअर विद्यार्थ्यांनी गौतमला धमकावण्यासाठी एक ग्रुप तयार केला.

पीडित विद्यार्थ्याने केलेल्या तक्रारीनुसार, शुक्रवारी (30 ऑगस्ट) गौतमला हडोसिद्दपुरा येथील चर्चमध्ये जात असताना हा हल्ला झाला. त्याने सिनीअर्सने सांगितलेली गोष्ट न ऐकल्याने त्याच्यावर हा हल्ला करण्यात आला. त्याचा खांदा फ्रॅक्चर झाला. यामध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. शिवाय त्या विद्यार्थ्यांनी रूग्णालयात आरोपीच्या कुटुंबियांना धमकावल्याचा आरोप आहे.

भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 118(1) आणि 118(2), 126(2), 189 (2), 190 , 191(2) (दंगल) आणि 351 अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू आहे.