मॅनहोल शब्द लिंगभेदी! कॅलिफोर्नियाने बदलले नाव

38

सामना ऑनलाईन । कॅलिफोर्निया

प्रत्येक भाषेत लिंगवाचक शब्द असतात. विशेषतः प्रशासकीय क्षेत्रांमध्ये त्यांचा वापर अधिक होत असतो. उदा. राष्ट्रपती किंवा चेअरमन असे शब्द आपण सर्रास वापरतो. त्यात आपल्याला काहीही खटकत नाही. पण, कॅलिफोर्निया बर्कले या शहराच्या प्रशासनाला मात्र हे लिंगवाचक शब्द चांगलेच खटकले आहेत. म्हणून या प्रशासनाने आपल्या शब्दसंग्रहातून असे शब्द हद्दपार करत त्याला पर्यायी शब्द सुचवले आहेत. एखाद्या प्रशासकीय पातळीवर अशा प्रकारचा बदल प्रथमच घडताना दिसत आहे.

बर्कले या शहरात आता अनेक शब्दांमध्ये बदल केला जाणार आहे. प्रशासकीय पातळीवर याची सुरुवात करण्यात आली आहे. रस्त्यावरील सांडपाणी वाहून नेणाऱ्या मॅनहोलऐवजी आता मेन्टेनन्स होल असा शब्द वापरण्यात येणार आहे. तर मॅनमेड (पुरुषनिर्मित) या शब्दाऐवजी ह्युमन मेड (मानवनिर्मित) असा शब्दही प्रचलित करण्यात येणार आहे. प्रशासनाने बहुमताच्या जोरावर एक ठराव मंजूर केला असून त्यात 40 शब्दांची पुनर्रचना केली जाणार आहेत. जिथे लिंगवाचक शब्द असतील तिथे त्याच अर्थाचा तटस्थ भूमिका मांडणारे शब्द प्रचलित करण्यात येणार आहेत. मनुष्यबळ ऐवजी कार्यबळ, तिच्या ऐवजी त्यांच्या, त्याला किंवा तिला ऐवजी त्यांना असे शब्द वापरण्यात येणार आहेत.

या मागील संकल्पना रेजेल रॉबिन्सन या तेथील काउन्सिलच्या सर्वात तरुण सदस्याने विशद केली आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, या बहुतांश शब्दात मेन किंवा मॅन हा पुल्लिंगवाचक शब्द आहे. आजवर जे काही चांगलं घडलं आहे, त्यात फक्त पुरुषाचा सहभाग होता किंवा पुढाकार होता, असा चुकीचा समज त्यामुळे निर्माण होऊ शकतो. भविष्यात अशा गैरसमजांना फाटा देण्यासाठीच हे बदल करण्यात आल्याची माहिती रॉबिन्सन याने दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या